

नगर : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल तर्कवितर्क काही लोक करीत आहेत. त्यांच्या कुटुंबातील लोक काहीच बोलत नाही; पण दुसऱ्या पक्षातील लोक त्यावर टिप्पणी करीत आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्थिर करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.
अहिल्यानगर महापालिका महापौर व उपमहापौर पदग्रहण समारंभासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना माजी खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. विमान अपघातमध्ये ब्लॅकबॉक्सची चौकशी पुढे येणार आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी टिपण्णी करतात.
योग्य लोक योग्य पदावर पाठवत चला. हे निवळ मूर्खपणाचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे, त्यांच्या कुटुंबातील कोणाचीही चौकशीची मागणी नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे, अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात कधीच नव्हते, असे सांगत त्यांनी टिप्पणी करणाऱ्यांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाबद्दल ते म्हणाले, पक्ष विलीनीकरणाविषयी बोलण्याचा अधिकार त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आहे. विलीनीकरणाची चर्चा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय त्यांच्या नेत्यांनी तो घ्यावा. त्यांनी तो घेतला आहे. कारण, भाजप-शिवसेनेची सहमती घेणे आवश्यक आहे. त्यात काही लोकांना इतकी घाई का झाली आहे. त्यांचा पक्ष आहे ते ठरवतील.