Gun Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Police Attack: श्रीरामपूरमध्ये आरोपीला पकडताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला; हवेत गोळीबार

कोयत्याच्या हल्ल्यात पोलिस गंभीर जखमी, तळेगाव दाभाडे पोलिसांची धाडसी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथील पोलिसांवर आरोपीच्या नातेवाइकांसह जमावाने जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. दरम्यान, या हल्ल्यात कोयत्याचा घाव लागून एक पोलिस गंभीर जखमी झाला. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपीला अटक करून तळेगाव दाभाडे पोलिस रवाना झाले.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी आयद बाबूलाल सय्यद हा श्रीरामपूर येथे घरी असल्याची माहिती तेथील पोलिसांना समजली. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील पोलिस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, हेडकॉन्स्टेबल संतोष जाधव, कॉन्स्टेबल प्रीतम सानप, प्रकाश जाधव व किरण मदने यांचे पथक बुधवारी (दि. 7) दुपारी श्रीरामपूरला आले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन हे पथक खासगी वाहनाने शहरातील इराणी गल्लीत (वार्ड नं. 1) दाखल झाले.

पोलिस दुपारी पावणेतीनच्या सुमारास आरोपीच्या घराजवळ गेले. तेव्हा आरोपीच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे उपनिरीक्षक मोहारे आणि महिला पोलिस घरात गेले आणि आरोपी आयदबाबत विचारणा केली. घरातील एक लहान मुलगा व महिलांनी ‌‘आयद येथे नाही‌’ असे सांगितले आणि घराची झडती घेण्यासही विरोध केला. दरम्यान, तेथेच असलेला आरोपी आयद पोलिसांना पाहून घराच्या पाठीमागील दरवाजातून बाहेर पळाला. घराच्या मागे थांबलेले पोलिस कॉन्स्टेबल किरण मदने यांनी ते पाहिले आणि त्याला पकडण्यासाठी पळत मदतीसाठी अन्य सहकाऱ्यांना हाका मारल्या. त्यामुळे पोलिस घराच्या पाठीमागे पळाले. मदने यांनी पळत जाऊन घराच्या कम्पाउंडवरून उडी मारून आयदला जागीच पकडले.

दरम्यान, तोपर्यंत अन्य पोलिसांनी आयदला पकडले. तो पोलिसांना प्रतिकार करत झटापट करू लागला. त्या वेळी गल्लीत मोठी गर्दी झाली होती. मात्र या गर्दीतील 5 ते 7 जणांनी आरोपी आयदला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी तेही पोलिसांशी झटापट करू लागले. त्याच वेळी जमावातील 18 ते 19 वयोगटातील एक मुलगा हातात कोयता घेऊन शिवीगाळ करत पोलिसांवर धावून आला. कोणाला काही कळायच्या आत त्याने कॉन्स्टेबल किरण मदने यांच्या डोक्यावर कोयत्याचा वार केला. मात्र मदने यांनी ते हातावर झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला मोठी जखम होऊन ते रक्तबंबाळ झाले. दुसरीकडे जमावातील लोक आरोपीला सोडविण्यासाठी शिवीगाळ करत पोलिसांशी झटापट करतच होते.

मदने रक्तबंबाळ झालेले पाहून आणि जमाव हिंसक होत चालल्याचे पाहून पोलिस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी स्वसंरक्षणार्थ त्यांच्याकडील पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून जमावाने लगेच पळ काढला. दरम्यान, तोपर्यंत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील तीन ते चार पोलिस त्यांच्या मदतीस आले. जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी आयद सय्यद याला ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल अजय विलास सरजिने यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आयद बाबूलाल सय्यद, झेरू (पूर्ण नाव समजले नाही) आणि महिलांसह अन्य 5 ते 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी आयद घेऊन तळेगाव दाबाडे येथील पोलिस रवाना झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT