बाळासाहेब खेडकर
बोधेगाव : शेवगाव नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित जाहीर झाल्याने नगराध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक मातब्बरांच्या पदरी निराशा आली आहे. आता नगराध्यक्ष आपण नाही, तर पत्नीला किंवा नगरसेवकाची संधी मिळावी अशी विवंचना त्यांना लागली असून त्या मातब्बरांचे आता बुधवारी (दि. 8) जाहीर होणाऱ्या नगरसेवकपदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले आहे.
आता लांबलेली नगरपरिषदेची निवडणूक दिवाळीनंतर होत असल्याने थेट जनतेतून प्रथमच पार पडणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. सोमवारी (दि. 6) पार पडलेल्या आरक्षणाच्या सोडतीत शेवगाव नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे मातब्बरांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
शेवगाव नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवगाव शहरात प्रभागांची संख्या 21, तर नगरसेवकांची संख्या 21 होती. आता शहरात 12 प्रभाग निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे नगरसेवकांची संख्या 24 राहणार आहे.
नगर परिषदेची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून, आता नगराध्यक्षपदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. बुधवारी नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत शेवगाव तहसील कार्यालयात होणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागातील मतदारांची यादी जाहीर होणार असून, दिवाळीनंतर कधीही नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने मतदारांची दिवाळीही गोड होणार असल्याचे संकेत दिसत आहे. शेवगाव शहराची लोकसंख्या सध्या पन्नास हजारांच्या आसपास जाऊन पोहोचली आहे.
मतदारांची संख्या 40 हजारांदरम्यान आहे. शेवगाव नगरपरिषदेच्या 2016च्या पार पडलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घुले गटाने नऊ, तर आ. मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने आठ जागा पटकावल्या होत्या. चार अपक्षांनी बाजी मारल्याने अपक्षांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या वेळी अपक्ष चार पैकी तिघांनी राष्ट्रवादीच्या घुले गटाला आपले समर्थन जाहीर केल्याने शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी त्यावेळी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण असताना राष्ट्रवादीच्या घुले गटाने पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे यांच्या सौभाग्यवती विद्याताई लांडे यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली.
त्यानंतर दुसऱ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात काही अपक्षांसह राष्ट्रवादीच्या घुले गटातील काहींनी भाजपला समर्थन जाहीर केल्याने शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या राणीताई विनोद मोहिते यांची निवड झाली. आता नगरपरिषदेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीचा घुले गट व भाजप, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना या वेळी स्थानिक आघाडी अटीतटीचा बहुरंगी राजकीय लढती होण्याची शक्यता दिसून येत आहे.
इच्छुकांच्या नावाची चर्चा
भाजपकडून रत्नमाला महेश फलके, माया अरुण मुंडे, दीप्ती कमलेश गांधी, सुजाता सागर फडके; राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्षा विद्या अरुण लांडे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्वाती सुनील रासने, स्नेहा हरीश भारदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्नेहल दत्तात्रय फुंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. नगरसेवक पदाच्या सोडतीनंतर जोरदार राजकीय हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.