

अमोल कांकरिया
पाथर्डी : गेली साडेबारा वर्ष पालिकेत पुरुषांनी नगराध्यक्षपद भूषवल्याने या वेळी महिलेला नगराध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळेल असे वाटत होते. मात्र, सर्वांचा अंदाज फोल ठरला. या प्रवर्गातून महिला उमेदवारही उभ्या राहू शकत असल्या, तरीही सर्वच पक्ष पुरुष उमेदवारालाच संधी देण्याची शक्यता जास्त आहे.(Latest Ahilyanagar News)
नगराध्यक्षपदाच्या काढलेल्या सोडतीत सोमवारी (दि. 6) नगराध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी निघाल्याने या प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्वच उमेदवारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
गतवेळी झालेल्या निवडणुकीत आ. मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची बहुमताने सत्ता आली होती. भाजपकडून अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, डॉ. मृत्युंजय गर्जे, बजरंग घोडके, मंगल कोकाटे, अमोल गर्जे हे दावा करू शकत असले, तरीही या पदाचे प्रबळ दावेदार म्हणून सध्या अभय आव्हाड यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. विरोधी आघाडीकडून बंडू पाटील बोरुडे हे प्रबळ दावेदार मानले जातात. पालिकेत एकूण 23 हजार 400 मतदार असून, एकूण 20 नगरसेवक निवडून द्यायचे आहे. गेल्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या 17 होती. त्यात आता तीनची भर पडली आहे. बुधवारी (दि. 8) नगरसेवकांचे आरक्षण पडणार असून, वीस पैकी दहा महिला सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे.
सध्या तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांची मदार ही खा. निलेश लंके यांच्यावरच अवलंबून आहे. या निवडणुकीत आजी-माजी आमदार असलेले शिवाजीराव गर्जे व चंद्रशेखर घुले हेही पॅनल उभे करू शकत असल्याने या वेळी तिरंगी लढत होऊ शकते किंवा वेळ पडल्यास राजळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे करण्यासाठी विरोधी सर्वपक्षीय आघाडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
ढाकणेंच्या भूमिकेकडे लक्ष
आजपर्यंत पालिका निवडणुकीचा इतिहास पाहता पालिकेत राजळेंविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांच्यातच लढत झालेली आहे. मात्र, ढाकणे यांच्या साखर कारखान्याला देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याने या निवडणुकीत ढाकणे यांची काय भूमिका असणार यावर बरीच काही गणिते अवलंबून आहेत.