

शशिकांत भालेकर
पारनेर : पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी राखीव झाले आहे. नगराध्यक्षपद जनतेतून असणार असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार असून, उमेदवारी निश्चितीबाबत सर्व पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. (Latest Ahilyanagar News)
जानेवारी 2022ला झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असताना तत्कालीन आमदार खा. निलेश लंके यांनी आपले राजकीय कसब वापरत नगरसेवकांची मोट बांधत बहुमताचा जादुई आकडा गाठून सत्ता आपल्या ताब्यात ठेवली.
राष्ट्रवादीचे 7 व शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आले होते. शहर विकास आघाडी 2, अपक्ष 2 भाजप 1 असे पक्षीय बलाबल होते. खा. लंके यांनी तालुका आघाडीचे 2, अपक्ष 1 नगरसेवकांना सोबत घेत विजय औटी यांची वर्णी लागली होती. सव्वा वर्षानंतर नगराध्यक्ष बदलण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे औटी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर काही नाट्यमय घडामोडी झाल्या. त्यात नितीन अडसूळ यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांची मुदत संपली. मात्र, राजकीय परिस्थिती बदलली असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचे बोलले जाते.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेकांनी त्या दृष्टीने आखणी सुरू केली आहे. आरक्षण सोडत अनेकांच्या पथ्यावर पडल्याने येत्या काळात इच्छुकांच्या संख्येत भर पडणार आहे.
नगरपंचायत निवडणुकीत विजय सदाशिव औटी, वसंत चेडे, अशोक चेडे, युवराज पठारे, नीलेश खोडदे, नितीन अडसूळ, योगेश मते, अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे आदींची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
निवडणुकीत रंगत वाढणार
पारनेर नगरपंचायत स्थापनेवेळी सर्वसाधारण महिला पदासाठी राखीव होते. त्यानंतर जानेवारी 2022 रोजी झालेल्या सोडतीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव राहिले. नव्याने निघालेली सोडत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढणार असून, निवडणुकीत रंगत वाढणार आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे आ. काशिनाथ दाते, माजी खा. डॉ. सुजय विखे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. महाविकास आघाडीची धुरा खा. निलेश लंके सांभाळत असल्याने ते येत्या काळात कोणती रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे.