

दीपक देवमाने
जामखेड : जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची तयारीला सुरुवात झाली आहे. आरक्षण जाहीर होताच अनेकांनी सौभाग्यवतींसाठी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. (Latest Ahilyanagar News)
सन 2016नंतर 2021ला निवडणूक होणे गरजेचे होते. परंतु कोरोनाची लाट असल्याने निवडणूक सातत्याने पुढे ढकलत गेल्याने इच्छुकांचा हिरमोड होत होता. त्यामुळे इच्छुक उमेदवार हे निवडणूक आता होईल या आशेने अनेक वर्ष विविध उपक्रम राबवताना दिसत होते.
या निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे विरुद्ध आ. रोहित पवार अशी सरळ लढत होणार असून, या निवडणुकीत स्थानिक विकास आघाडी या दोन्ही पक्षांची समीकरणे बिघडविणार का हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. सद्यस्थितीला दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना, तसेच काँग्रेस यासह मित्र पक्ष व इतर पक्षाची भूमिका निर्णयक राहणार आहे.
जामखेड नगरपरिषदेची सन 2016मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत आ. सुरेश धस व प्रा. राम शिंदे व स्थानिक विकास आघाडी असे गट पडले होते. या लढतीत आ. धस यांच्या रणनीतीचा फायदा त्या काळाच्या राष्ट्रवादीला झाला होता. त्यावेळेस एकूण 21 नगरसेवक होते. त्यापैकी राष्ट्रवादीचे 10, भाजपचे 3, शिवसेना 4, मनसे 1, अपक्ष 3 अशी समीकरणे झाले होते. यामध्ये आ. धस यांनी अपक्ष असलेले प्रीती विकास राळेभात व राजश्री मोहन पवार अशा दोन अपक्षांनी आ. धस यांच्याकडे गेले होते. त्यानुसार आ. धस यांनी अपक्ष असलेल्या प्रीती राळेभात यांना प्रथम नगराध्यक्ष केले होते. त्यावेळेस तत्कालीन शिवसेना नेते मधुकर राळेभात यांनी निवडणूक झाल्यानंतर भाजपची युती तोडत त्यांनी राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्याबरोबर संधान साधले होते.
सन 2016च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. सुरेश धस यांनी आ. राम शिंदे यांचा दारूण पराभव केला होता. हा पराभव प्रा. शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता. त्यावेळेस प्रा. शिंदे 12 खात्याचे मंत्री असतानाही भाजपला फक्त 3 जागा मिळविण्यात यश आले होते. त्यावेळेस तिसऱ्या स्थानिक आघाडीचा फटका भाजपला बसला होता. तिसऱ्या आघाडीने सरासरी 100 ते 150 मते घेतल्याने पराभवाची चव भाजपला चाखावी लागली होती. या निवडणुकीत तरी तिसरी आघाडी रोखण्यात विद्यमान सभापती प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार यांना यश येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दलबदलूंमुळे दोन्हीकडे सत्तांतर
5 वर्षांच्या कारकिर्दीत सुरुवातीला 1 वर्ष राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष असलेल्या राळेभात यांच्यावर अविश्वास दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी प्रीती राळेभात यांनी राजीनामा देण्यात आला होता. त्यावेळेस 17 नगरसेवकांनी अविश्वास ठरावास संमती दिली होती. त्यानुसार भाजपच्या अर्चना राळेभात नगराध्यक्षा झाल्या होत्या. त्यावेळेस नगरसेवकांनी राष्ट्रवादीसह काही अपक्ष नगरसेवकांनी भाजपची साथ दिली होती. ही साथ सन 2019च्या विधानसभा निवडणूक होताच राज्यात सत्तांतर होताच पुन्हा नगरसेवकांनी राष्ट्रवादी आ. रोहित पवार यांच्याकडे गेल्याने भाजपची सत्ता उलथवली गेली होती. त्यामुळे दलबदलू नगरसेवक भाजप व राष्ट्रवादी दोन्हीकडेही सत्ता भोगण्यासाठी गेले होते. त्यामुळे या नगरसेवकांवर आता पक्ष कितपत विश्वास दाखवणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.