

कैलास शिंदे
नेवासा : नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण निघाल्याने विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. जनतेतून नगराध्यक्ष होणार असल्याने आणि सर्वसाधारण आरक्षण असल्याकारणाने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नेवाशात नगराध्यक्षासाठी निश्चितच रस्सीखेच होणार आहे. इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे.(Latest Ahilyanagar News)
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत सोमवारी (दि. 6) मंत्रालयात काढण्यात आली. यामध्ये नेवासा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचीही सोडत काढली गेली आहे. नगराध्यक्षपदाची अडीच वर्षांपूर्वीही सर्वसाधारणच सोडत निघाली होती. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे नगरपंचायतीची निवडणूक सतत लांबणीवर पडत होती. आता दिवाळीनंतर ही नगरपंचायत निवडणूक होणार असल्यामुळे नगराध्यक्षपदाची सोडत काढली गेली. यामध्ये पुन्हा ‘जैसे थे’च सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने सकाळपासून शहरात इच्छुकांनी सोशल मीडियावर चर्चेचे काहूर उठवले आहे. इच्छुकांच्या समर्थकांनी आपापल्या नेत्यांची नावे जाहीर करून आपणच कसा शहराचा विकास करणार असल्याचे सांगितले जात होते.
गडाख गट-महायुतीत लढतींची शक्यता
तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांवर गडाख गटाचे प्राबल्य आहे. मतदारसंघात महायुतीचा आमदार आहे. गडाख गटाकडून व महायुतीकडूनही नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी राहणार आहे. गडाख-महायुती यांच्यामध्येच नगरपंचायत निवडणूक होण्याची शक्यता आहे. नेवासा नगरपंचायतीचे 17 प्रभागांची रचना आहे. या नगरपंचायतच्या प्रभागरचनेची बऱ्याच ठिकाणी तोडमोड झाल्याचे सांगितले जाते. ही तोडफोड काही इच्छुकांच्या फायद्याची, तर काहींच्या नुकसानीची चर्चा शहरात होत आहे.