अहिल्यानगर : शहरात हिंदूंना लक्ष्य करत आव्हान देणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आता यापुढे या घटना सहन केल्या जाणार नाहीत. जेव्हा केव्हा लव्ह जिहाद, हिंदू देवतांची विटंबना, महापुरुषांचा अवमान, तसेच संविधानविरोधी कृत्य, अशा घटना घडतील, तेव्हा अगोदर जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यानंतरच मोर्चे काढले जातील, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी दिला.(Latest Ahilyanagar News)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारी पत्रके टाकल्याची घटना नुकतीच शहरात घडली. त्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने रविवारी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, युवा नेते सागर बेग, भीमशक्तीचे नेते वाल्मीक निकाळजे आदी मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. हिंदू नागरिक व आंबेडकरी समाजाचे नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. रणरणत्या उन्हातही या मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. दिल्लीगेट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
आमदार जगताप यांनी डेमोग्राफिकल जिहाद या विषयावर भाष्य करत पश्चिम बंगाल आणि मालेगाव येथील उदाहरणे दिली. हिंदूंकडूनच खरेदी करण्यात गैर काहीच नाही, असे सांगत याची सुरुवात त्यांनी रमजान ईदच्या दिवशी पत्रके वाटून केली होती. जे राष्ट्रगीत म्हणत नाहीत अशांना आगामी निवडणुकीत निवडून देऊ नका, असे आवाहन करीत, देश, संविधान आणि धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदूंनी संघटित व जागृत होणे आवश्यक आहे. संविधानाचा मान राखत असल्याचे सांगणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांनी, डॉ. आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या फरीद खानचा निषेध का केला नाही? असा सवाल त्यांनी केला.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या जिहादी वृत्तीला आधीच ओळखले होते. त्यामुळे त्यांना पूर्णपणे पाकिस्तानमध्ये पाठवा, अशी मागणी त्यांनी फाळणीच्या वेळी केली होती. त्या वेळी बाबासाहेबांचे ऐकले असते तर आपल्यावर मोर्चा काढण्याची वेळ आलीच नसती. पुढील काळात हिंदू धर्माचा व महापुरुषांचा अपमान आम्ही कधी सहन करणार नाही. जे हात महापुरुषांची विटंबना करतील त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी आहोत. त्यांनी हिंदू धर्माचे रक्षक म्हणून भूमिका पुढे सुरूच ठेवावी, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.
भारताबद्दल ज्यांना प्रेम नाही त्यांना येथे राहण्याचा हक्क नाही. ज्या वेळेस भारत क्रिकेट सामना हरतो, तेव्हा ते फटाके उडवतात, हे आता कधीही सहन केले जाणार नाही, असा इशाराही आमदार पडळकर यांनी दिला.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, नानासाहेब वाघमारे, शरद म्हसे, विराज औधुते आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एमआयएमचे नेते नगरमध्ये येऊन अहिल्यानगरऐवजी आम्ही अहमदनगरच म्हणू असे जाहीरपणे सांगतात. ज्यांना ही नावे नको ते देशाचे विरोधक आहेत. ज्याच्या दुकानांवर अहमदनगर असा फलक असेल अशा दुकानांचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करून कारवाई करावी, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली.