गणोरे: ग्रामीण आदिवासी भागातील तरुणी मुंबईच्या चंदेरी दुनियेत नाव कमविण्यासाठी येते पण तेथील व्यवस्थेची ती बळी ठरते. मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी युवा अभिनेत्री संचिता उगले हिचे अवघ्या वयाच्या २५ व्या वर्षी मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरी तिने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. त्यामुळे मनोरंजन विश्वात तसेच तिच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
संचिता उगले अकोले तालुक्यातील गणोरे जवळील डोंगरगाव येथील मूळ रहिवासी. तिचे वडील मच्छिंद्र उगले शेतकरी तर आई जयश्री गृहिणी आहे. डोंगरगाव येथे संचिताचे बालपण गेले. तिने गावातील मराठी शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर कुटुंब मुंबईत स्थायिक झाल्याने पुढील शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. अभिनयाची आवड जोपासत तिने मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर रुपेरी दुनियेत आपले स्थान निर्माण केले होते.
संचिता उगले हिने मराठी आणि हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. टीव्ही वरील मालिकामध्ये विविध भूमिका साकारून तीने प्रेक्षकांची मने जिंकली. यश न मिळाल्याने किंवा सतत अपयश आल्याने अनेकदा मानसिक तणाव वाढतो. काही वेळा अपेक्षा आणि वास्तव यामध्ये मोठी दरी निर्माण होते. प्रत्येक क्षेत्रात मेहनत आणि वेळ लागतो. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने बोलणे, मदत घेणे याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील मुली असोत किंवा शहरी. त्यांचे स्वप्न, संघर्ष आणि भावना समान असतात. फिल्म इंडस्ट्री हे संधींचे क्षेत्र आहे, पण तितकेच कठोरही आहे. त्यामुळे यशाबरोबरच मानसिक स्थैर्य, योग्य मार्गदर्शन आणि वास्तवाची जाणीव असणे हेच खरे यशाचे सूत्र आहे. संचिता हिने एका मुलाखतीत सांगितले होते की, मुंबईसारख्या शहरात टिकून राहणे आणि 'आऊटसायडर' म्हणून बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळवणे खूप कठीण असते. त्यामुळे त्या टीव्ही मालिकांमधील चांगल्या भूमिकांना प्राधान्य देत होत्या. तिने आपल्या बेधडक स्वभावाने ग्लॅमर इंडस्ट्रीतील कटू सत्यही मांडले होते.
एका मुख्य भूमिकेसाठी निवड झाली असतानाही अगदी शेवटच्या क्षणी तिला मालिकेतून बदलण्यात आले होते, ज्याचा त्यांना मानसिक धक्का बसला होता. काही काळापूर्वी संचिताने सोशल मीडियावर येणाऱ्या मानसिक दबावावर चिंता व्यक्त केली होती आणि तरुण पिढी या ऑनलाइन व्हॅलिडेशनला बळी पडत असल्याचे म्हटले होते. तिच्या निधनाने इंडस्ट्रीने एक उत्तम आणि स्पष्टवक्ता तरुण कलाकार गमावला आहे. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे.