Rashin Jagdamba Devi Palkhi Mahotsav Pudhari
अहिल्यानगर

Rashin Jagdamba Devi Palkhi Mahotsav: राशीनच्या जगदंबा देवीचा पालखी महोत्सव भक्तिभावात; हजारो भाविकांची मांदियाळी

ढोल-ताशांचा गजर, तोफांची सलामी अन् गुलालाची उधळण; दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी भाविकांचे देवीला साकडे

पुढारी वृत्तसेवा

राशीन: ‘उदो बोला उदो उदो आई साहेबाचा उदो’ असा गगनभेदी जयघोष, सोबतीला ढोल-ताशे, नगारे आणि झांजांचा लयबद्ध आणि सातत्यपूर्ण गजर, रणशिंगांचा लक्षवेधी निनाद, आसमंत दणाणून टाकणाऱ्या तोफांची सलामी, चंगाळे बंगाळ्याचा मर्दानी खेळ, आराधी दिवटयावाल्यांचे जथे, अशा चैतन्यमय वातावरणात विजयादशमीच्या रात्री राशीनच्या जगदंबा देवीचा पालखी महोत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने दिमाखात पार पडला.

राज्यातून आलेल्या भाविकांची ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी झुंबड उडाली होती. पालखी मंदिरात गेल्यावर सोहळ्याची सांगता झाली. या नेत्रदीपक सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. घटस्थापनेला सुरू झालेल्या यमाई मातेच्या यात्रेची कोजागिरी पौर्णिमेला सांगता होते. विजयादशमीनिमित्त उत्साहात सीमोल्लंघन झाले. देवीच्या पालखीची मध्यरात्री निघालेली मिरवणूक बुधवारी रात्री आठ वाजता देवीच्या मंदिराजवळ विसर्जित झाली.

दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सर्व ग्रामस्थ सीमोल्लंघनासाठी आले. तिथे एकमेकांना सोने (आपट्याची पाने) देऊन अभिवादन केले. घरी गेल्यावर सुवासिनींकडून औक्षण केले. यानंतर रात्री दहा वाजता नागरिक देवीच्या मुख्य यात्रेसाठी मंदिरात आले. यावेळी पारंपरिक पद्धतीने देवीला कौल (प्रसाद) मागण्यात आला कौल (प्रसाद) मागण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला. देवीचे उजव्या बाजूचे फुल (प्रसाद) हातात पडल्यानंतर भाविकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यानंतर मुखवटे पालखीमध्ये ठेवले जातात.

भाविकांनी एकच जल्लोष करीत पालखीवर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण केली. सिंहाच्या आवारात पालखी आल्यानंतर भक्तीच्या या अनोख्या सागरात भान हरपून भाविक भक्तिरसात चिंब झाले होते. रात्री मंदिरातून पालखीने प्रस्थान ठेवले. सकाळी पालखी गावाच्या मुख्य रस्त्यावर आली. यानंतर दिवसभर संपूर्ण गावात पालखी प्रदक्षिणा घातली. महिलांनी पालखी मार्गावर सडा, रांगोळ्या काढल्या. प्रत्येक रस्त्यावर पालखीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिस उपअधीक्षक सुजीत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते.

दुष्काळ दूर करण्याचे जगदंबेला साकडे

यंदा दुष्काळाचे सावट गडद झाले असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक विविध अडचणींचा सामना करत आहेत. या कठीण परिस्थितीत राज्यातील जनतेचे दुःख दूर होऊन त्यांच्या जीवनात सुख, समाधान व आनंद निर्माण होऊ दे, दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, अशी आर्त प्रार्थना भाविकांनी जगदंबेचरणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT