Mohatadevi Temple Navratri: घटी बसलेल्या महिलांचा सुरू झाला पाणावलेल्या डोळ्यांनी परतीचा प्रवास!

आठ दिवस देवीची सेवा, खडा पहारा आणि उपवास अष्टमीच्या होमहवनानंतर मोहटादेवी गडाला भावपूर्ण निरोप
Mohatadevi Temple Navratri
Mohatadevi Temple NavratriPudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: 'वर्षानुवर्षे तुझी सेवा घडू दे, तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू दे. आमच्या कुटुंबातील सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटी लाभू दे,' अशी मनोभावे प्रार्थना करत शारदीय नवरात्रोत्सवात घटस्थापनेपासून खडा पहारा आणि घटी अनुष्ठानासाठी बसलेल्या महिला भाविकांनी अष्टमीच्या होमहवनाच्या पूर्णाहुतीनंतर पाणावलेल्या डोळ्यांनी मोहटादेवी गडाचा निरोप घेतला.

आठ दिवस देवीच्या सेवेत रमलेल्या या महिलांचा परतीचा प्रवास जड अंतःकरणाने सुरू झाला. देवीच्या चरणी सेवा करण्याचे समाधान, भक्तिभावाने भरलेले मन आणि पुन्हा पुढील वर्षी गडावर येण्याची ओढ घेऊन महिला भाविक आपापल्या घराकडे रवाना झाल्या.

Mohatadevi Temple Navratri
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधचा पेच कायम; विखे पाटील, थोरात आणि राम शिंदेंचे प्रयत्न निष्फळ

श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या उत्सवात राज्याच्या विविध भागांतून महिला भाविक मोठ्या श्रद्धेने गडावर येतात. घटस्थापनेपासून अष्टमीपर्यंत उपवास, खडा पहारा आणि घटी अनुष्ठान करत त्या देवीची आराधना करतात. यंदाच्या नवरात्रोत्सवात सुमारे तीन हजार महिला भाविकांनी या धार्मिक अनुष्ठानात सहभाग घेतला.

आठ दिवस संसारातील दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून दूर राहून संपूर्ण वेळ देवीच्या सेवेत व्यतीत करण्याचा अनुभव या महिलांनी घेतला, घटस्थापनेच्या दिवसापासूनच मोहटादेवी गडावर घटी बसलेल्या महिलांच्या धार्मिक अनुष्ठानाला सुरुवात झाली.

पहाटेची आरती, सायंकाळची आरती, रात्री होणारे कीर्तन, देवीचे भजन, गडाला प्रदक्षिणा घालणे, लोटांगण घालून देवीप्रति श्रद्धा व्यक्त करणे, अशा विविध धार्मिक उपक्रमांत महिला भाविक सहभागी झाल्या. आराधी महिलांच्या नृत्यानेही नवरात्रोत्सवातील धार्मिक वातावरणात रंग भरला. दिवसभर देवीच्या सेवेत आणि रात्री धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होत आठ दिवस कधी संपले, हे कळलेही नाही, अशी भावना अनेक महिला भाविकांनी व्यक्त केली.

घटी बसलेल्या महिलांसाठी नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून श्रद्धा, भक्त्ती आणि मानसिक समाधान देणारा अनुभव असतो. घटस्थापनेपासून सुरू झालेले अनुष्ठान, नियमित उपवास, खडा पहारा आणि देवीच्या चरणी केलेली सेवा यामुळे महिलांचे गडाशी भावनिक नाते निर्माण होते.

Mohatadevi Temple Navratri
Palghar Rice Farming: पालघर जिल्ह्यात हळव्या भाताची कापणी सुरू; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

आठ दिवस एकत्र राहून देवीची आराधना करताना विविध गावांतून आलेल्या महिलांमध्येही आपुलकीचे नाते निर्माण होते. अष्टमीला होमहवनाची पूर्णाहुती झाल्यानंतर हे अनुष्ठान संपते; मात्र गडावर घालवलेल्या आठ दिवसांच्या आठवणी त्यांच्या मनात कायम राहतात. होमहवनाची पूर्णाहुती झाल्यानंतर घटी बसलेल्या महिलांनी देवीचे दर्शन घेतले.

आपल्या कुटुंबाला सुख-समृद्धी लाभावी, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि वर्षभर देवीची कृपा कायम राहावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यानंतर आपापल्या गावाकडे जाण्यासाठी महिलांनी परतीचा प्रवास सुरू केला.

गडावरील वास्तव्य संपत असल्याने अनेक महिलांचे डोळे पाणावले होते. आठ दिवस ज्या देवीच्या चरणी सेवा केली, त्या देवीचा निरोप घेताना मन भरून आल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. नवरात्रोत्सवाच्या काळात घटी बसलेल्या महिलांच्या निवासाची तसेच खिचडी आणि चहाची व्यवस्था देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली होती.

त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला भाविकांना गडावर राहून आपले धार्मिक अनुष्ठान पूर्ण करता आले. अष्टमीच्या होमहवनानंतर उपवास सोडण्यासाठी महिला आपापल्या घरी रवाना झाल्या.

मोहटादेवी गडावर यंदाच्या नवरात्रोत्सवात पाचेगाव, राहुरीसह राज्याच्या विविध भागांतून महिला भाविक घटी अनुष्ठानासाठी आल्या होत्या. मंदाबाई जाधव (तांबेगाव), ताराबाई कोल्हे (रायमोह), तुळसाबाई वीर (पैठण) यांच्यासह सुमारे तीन हजार महिलांनी या धार्मिक उपक्रमात सहभाग घेतला. आठ दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर अष्टमीच्या होमहवनाची पूर्णाहुती झाली आणि घटी बसलेल्या महिलांचा परतीचा प्रवास सुरू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news