Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का; १२ जागांवर चुरशीच्या लढती

२१ पैकी ९ जागा बिनविरोध; तनपुरे-कदम, पाचपुते-पानसरे आमनेसामने, तर लंके-विखे संघर्ष पुन्हा रंगणार
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

गोरक्ष शेजूळ

नगर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत 21 पैकी 9 जागा बिनविरोध करण्यात प्रस्थापितांनी यश मिळवले; मात्र संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्याच्या मनसुब्यावर नाराज आणि विस्‍थापितांच्या भूमिकेने पाणी फेरले. आता 12 जागांवर प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित मैदानात उतरले आहेत. या लढतींकडे आता जिल्‍ह्याचेच नव्‍हे तर राज्‍याचे लक्ष लागलेले असेल.

Ahilyanagar District Bank
Mohatadevi Temple Navratri: घटी बसलेल्या महिलांचा सुरू झाला पाणावलेल्या डोळ्यांनी परतीचा प्रवास!

तनपुरेंविरुद्ध सत्यजित कदम

आ. प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी सत्यजित चंद्रशेखर कदम यांनी थांबावे, यासाठी बुधवारी शेवटपर्यंत प्रयत्न झाले. मात्र सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, त्याचबरोबर राहुरी तालुक्याची अस्मिता आणि मतदारांचा स्वाभिमान दाखवून ठेवण्यासाठी मी लढणारच, हे कदम यांनी श्रेष्ठींना सांगून, माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहुरीतून (सोसायटी) तनपुरे विरुद्ध कदम अशी लढत निश्चित झाली. कदम अपक्ष लढणार आहेत.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधचा पेच कायम; विखे पाटील, थोरात आणि राम शिंदेंचे प्रयत्न निष्फळ

पाचपुते-पानसरेंची हायव्होल्टेज लढत!

श्रीगोंदा सोसायटीतून माजी आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला असला, तरी त्यांचे समर्थक दत्तात्रय पानसरे यांची उमेदवारी कायम आहे. निवडणूक कार्यालयातही जगताप-पानसरे ‘साथ साथ’ दिसले. त्यामुळे आता श्रीगोंद्यात आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे बंधू प्रतापसिंह विरुद्ध दत्ता पानसरे ही हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.

आ. लहामटेंचा स्वपक्षातील गायकरांना काटशह

राष्ट्रवादीचे आ. किरण लहामटे आणि ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांच्यात मतभेद वाढले आहेत. यातून गायकर यांनी पिचडांना जवळ केल्याचा सल लहामटेंच्या मनात आहेच. कदाचित, त्यामुळेच त्यांनी अनुसूचित जाती जमातीमध्ये वैभव पिचड यांच्याविरोधातील अर्ज मागे घेताना गायकर यांची कन्या संजीवनी शिंदे यांच्या विरुद्ध सोसायटीतून अर्ज ठेवला. त्यामुळे आता लहामटे विरुद्ध शिंदे-गायकर असाच संघर्ष होणार आहे.

सांगळे -ढाकणे चुरशीची लढत

भटक्या विमुक्त जमातीमध्ये विद्यमान संचालक गणपत सांगळे यांची थोरात-विखे गटातून उमेदवारी अंतिम झाली. ही जागा बिनविरोधचे प्रयत्न झाले. मात्र खा. नीलेश लंके यांच्या पॅनलमधून ऋषिकेश प्रताप ढाकणे यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या ठिकाणी ढाकणेंचा हा निर्णय थेट थोरातांनाच आव्हानच समजला जाणार आहे.

शिंदेंचे हजारे अन् गडाखांचे जावळे!

ओबीसीची एक जागा आहे. ही जागा विखे-थोरात यांनी सभापती शिंदेंना सोडल्याची चर्चा होती. या ठिकाणी शिंदेंकडून आदिनाथ हजारे यांचे नाव पुढे आले. मात्र, अर्ज माघारीनंतरही गडाख समर्थक काशीनाथ जावळे यांचा अर्ज राहिलेला असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Fake Facebook Account: पतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट, बदनामीकारक पोस्ट भोवल्या; न्यायालयाचा पत्नीला दणका

बिगरशेतीत जगतापांनी बाजी मारलीच!

आ. संग्राम जगताप यांनी बिगरशेतीमधून आपले बंधू सचिन जगताप यांची जागा बिनविरोध काढण्यासाठी स्वतः लक्ष घातले होते. त्यांची यंत्रणा दिवसभर ॲक्शन मोडवर दिसली. अगदी शेवटचा अर्ज निघेपर्यंत आ. जगताप हे ‘किती अन् कोणाचे अर्ज राहिलेत’ यावर लक्ष ठेवून दिसले. शेवटचा अर्ज गोल्हार आणि आरोटे यांचा निघाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मंजूषा गुंड की संगीता वाघ? संभ्रम कायम

महिला राखीवच्या दोनपैकी एका जागेवर अनुराधा नागवडे यांचे नाव ठरले होते. थोरातांचा आग्रह संगीता जयंत वाघ यांच्यासाठी होता. मात्र, या जागेवर सभापती शिंदेंनी बैठकीतच दावा करत मंजूषा गुंड यांचे नाव जाहीर केल्याचे दिसले. त्यामुळे गोंधळ वाढला. याशिवाय, याच मतदारसंघात खा. लंके यांच्या पॅनलमध्ये शिवसेनेकडून हर्षदा काकडे आणि सुप्रिया झावरे यांचेही अर्ज आहेत. याशिवाय अन्य काही अपक्षही रिंगणात आहेत.

आ. काळेंसोबत म्हस्के आले, पण ..!

शेतीपूरक मतदार संघातून आशुतोष काळे यांच्यासमोर फक्त सुधीर रावसाहेब म्हस्के यांचा अर्ज बाकी होता. माजी आमदार चंद्रशेखर घुले, आ. काळे यांच्यासमवेत सुधीर म्हस्के हे थेट निवडणूक कार्यालयात पोहचलेही, बंद दारआड चर्चाही झाली. मात्र, एक फोन आला अन् म्हस्केंनी माघारीसाठी नकार दिल्याचे कानावर आले. हा फोन कोणाचा होता, याची चर्चा सुरू होती.

पॅनलचे चित्र आज स्पष्ट होणार

अर्ज माघारी झाली. आज एकाच चिन्हासाठी पॅनलच्या उमेदवारांची यादी द्यावी लागणार आहे. आता या यादीत सभापती शिंदेंचे उमेदवार हे विखे-थोरातांच्या पॅनलमध्ये दिसतील, की खा. नीलेश लंकेंच्या, हे दुपारनंतरच स्पष्ट होणार आहे.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District Bank Election: शिंदे-विखे-थोरातांची बैठक तोडग्याविना

विखे - शिंदे समर्थकांचा सामना

सभापती राम शिंदे यांच्याकडे कर्जत आणि जामखेड सोसायटी मतदारसंघात बहुतांशी मतदार आहेत. मात्र, ते प्रस्थापितांसोबत बैठकीला गेल्याने त्यांच्या दोन जागा बिनविरोध निघू शकतात, असा अंदाज होता. मात्र, बुधवारी जामखेडमध्ये शिंदेसमर्थक सचिन घुमरे विरुद्ध सुधीर राळेभात आणि कर्जतमध्ये ज्योती शिंदे यांच्या विरुद्ध तुषार पिसाळ यांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत. राळेभात आणि पिसाळ हे दोन्ही उमेदवार विखेसमर्थक मानले जातात.

लंके-विखेे पुन्हा फाईट

बँक बिनविरोधच्या प्रक्रियेत खा. नीलेश लंकेही बैठकीला होते. मात्र, त्यात पारनेरवर चर्चा झालीच नाही. उलट ‘थांबण्याचा’ अप्रत्यक्ष संदेश लंकेंना मिळाला. त्यामुळे त्यांनी रात्रीपासूनच पॅनलची बांधणी सुरू केली होती. अखेर बुधवारी दुपारनंतर त्यांची भूमिका समोर आली. पारनेर सोसायटीतून आता प्रस्थापितांचे उमेदवार तथा सुजय विखे यांचे खंदे समर्थक राहुल शिंदे यांच्यासमोर लंके उभे ठाकले आहेत. ही लढत म्हणजे पुन्हा एकदा लंके-विखे यांच्यातील फाईट असेल, हे स्पष्टच आहे. आ. काशीनाथ दाते आणि गीताजंली शेळके यांनी येथून माघार घेतली आहे.

‘वॉर रूम’मधून अर्ज माघारीसाठी प्रयत्न

अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी 9 वाजेपासूनच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या ‘विरंगुळा’ बंगल्यावर हालचाली वाढल्या होत्या. या ठिकाणी माजी आमदार चंद्रशेखर घुले आले. त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉ. सुजय विखे पाटील आदींनी एकत्रित बसून व्यूहरचना केली. याशिवाय, ‘आशीर्वाद’ बंगला, विळद घाट, हॉटेल पॅराडाईज, रयत शिक्षण संस्था कार्यालय, शासकीय विश्रामगृह इत्यादी ठिकाणे ‘वॉर रुम’ बनल्याची चर्चा दिसली.

अश्रू अनावर...!

स्व. ॲड. उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके मावळत्या संचालक. महिला राखीव आणि पारनेर सोसायटी मतदार संघातून त्यांचा उमेदवारी अर्ज होता. ही जागा राष्ट्रवादीची, मात्र जागा वाटपात ती भाजपाकडे गेली. दरम्यान, दुपारी त्‍यांनी अर्ज काढून घेतला, त्यावेळी ‘मी सोसायटीतून लढणार आहे’ असे त्यांनी सांगितले होते. मात्र दुपारी दोननंतर त्यांनी निवडणूक कार्यालयात येऊन सोसायटीमधीलही अर्ज माघारी घेताना स्व. उदय शेळके यांच्या अनुपस्थितीची जाणीव झाली आणि त्यांच्यासोबतच्या मुलीलाही अश्रू लपवता आले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news