

संदीप रोडे
सहकारातच नव्हे तर राजकारणातीलही एकेकाळचे वैमनस्य विसरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी हातात हात गुंफले. जगत्गुरू संत तुकाराम महाराजांचा एकमेका साह्य करू! अवघे धरू सुपंथ!! या अभंगाच्या ओळी दोन्ही नेत्यांना चपखल लागू पडतात, असे म्हणल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सर्वांनी परस्परांना मदत करून सन्मार्गावर चालावे असा त्या अभंगाचा मथितार्थ. विखे-थोरात यांनी एकमेकांना साह्य केले, पण त्यातून अनेकांचा की अनेकांनी या दोघांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, असा संभ्रम निर्माण झाला आहे. या ‘करेक्ट’च्या कोड्याचे उत्तर सहकारातील धुरीणच नव्हे तर राजकारणातील धुरंधरांनाही सुटेनासे झाले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत विखे-थोरात-गडाख ऐतिहासिक युतीने भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या, किंबहुना बँकेत प्रवेशाची सरधोपट वाटही आडवाट होऊन बसली!
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी २ नोव्हेंबरला मतदान होत आहे. यातील १४ तालुका सोसायटीच्या जागांवर त्या त्या तालुक्यातील किल्लेदारांचे वर्चस्व. अन्य सर्वसाधारणच्या सात जागांची गणिते सोडविण्याला संगमनेरी ‘हात’चा घ्यावाच लागेल, असे आजच्या मतदारांचे चित्र. जिल्हा बँकेची निवडणूक आजपर्यंत ‘विखे विरुद्ध थोरात’ अशी लढली गेली. तोच अंदाज गृहीत धरून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ‘शासकीय कार्यक्रम’तून सहकारातील जुन्याजाणत्या ज्येष्ठांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू केला. एकीकडे प्रा.शिंदे सहकाराची मोट बांधत असताना दुसरीकडे ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यातील डॉक्टर असलेल्या सुजय विखे पाटील यांनी विखे-थोरात यांच्यात एकीचे ‘टाके’ टाकले. सुरुवातीला त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्याच वेळी बाळासाहेब थोरात-शंकरराव गडाख व डॉ. सुजय विखे पाटील सोनईतील ‘आमराई’त पुन्हा भेटले. या भेटीपासून प्रा. राम शिंदे व शरद पवारांचे शिलेदार खा. नीलेश लंके यांना दूर ठेवण्यात आले. पण माघारीच्या अगोदरच्या दिवशी मंगळवारी (दि.२०) थोरात-गडाखांसोबत पालकमंत्री विखे पाटीलही अवतरले! अर्थात विखे पाटलांनी सभापती शिंदेंना निमंत्रण देत सन्मानही दिला. माघारीच्या दिवशी बुधवारी मात्र वेगळेच चित्र दिसले. बँकेची निवडणूक बिनविरोधासाठी प्रा. शिंदे यांची अनुकूलता मिळवताना खा. लंके यांनाही थोरातांनी ‘निरोप’ दिला. मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेली बैठक खरोखरच बँक निवडणूक बिनविरोधासाठी की ‘करेक्ट कार्यक्रमाची’ पायाभरणी होती, हे सहकारातील नवख्यांना अजूनही कळेनासे झाले आहे. जिल्ह्याच्या सहकारातील मातब्बर घराणी या बैठकीला उपस्थित होती. याच बैठकीत सहकाराचा कानमंत्र दिल्याची चर्चा अजूनही थांबायचे नाव घेत नाही.
याच बैठकीत सभापती राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड सोसायटीसह अन्य दोन जागांची मागणी केली. त्यावेळी त्यांना कोणीच ‘क्रॉस’ केले नाही. खा. लंके यांनी मात्र रागरंग पाहून वरचेवर बिनविरोधाचे समर्थन केले, पण तेथून बाहेर पडताच ‘डाव-पेच’ टाकले. परिणामी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे) बरोबर घेण्यात खा. लंकेंना यश मिळाले. सहकारातील प्रस्थापित विखे-थोरातांशी थेट भिडण्यास लंके डगमगले नाहीत.
श्रीगोंद्यात सर्वाधिक ठराव असल्याचा दावा करणारे माजी आमदार राहुल जगताप यांना ऐन वेळी थांबावे लागले. पण तेथून दत्ता पानसरे यांच्या रूपाने आ. विक्रमसिंह पाचपुते यांचे बंधू प्रताप यांच्याही ‘करेक्ट कार्यक्रमा’ची चर्चा सुरू झाली. पारनेरमधून बँकेचे दिवंगत माजी अध्यक्ष उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली यांना ऐन वेळी थांबवण्यात आले. तेथून विखे समर्थक राहुल पाटील शिंदे यांना पुढे करत खा. लंके यांची वाट अडविण्याचा प्रयत्न समोर आला. त्याच वेळी बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड यांच्यासाठी हट्ट धरणारे आ. काशिनाथ दाते यांचाही नाईलाज झाला. अर्थात पारनेरमध्ये कोणी कोणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला याचे कोडे सुटता सुटेना..
भाजपवासी होत विधान परिषदेचे आमदार झालेले प्राजक्त तनपुरे यांना पक्षांतर्गतच सत्यजित कदमांच्या रूपाने अडथळा निर्माण झाला. माजी आमदार चंद्रशेखर कदम हे भाजपचे एकनिष्ठ नेते असतानाही त्यांचे चिरंजीव सत्यजित यांना न थांबवण्याचा ‘करेक्ट गेम’ तर खेळला गेला नाही ना, अशी शंका आता उपस्थित होऊ पाहते आहे. अकोल्यात ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांची कन्या संजीवनी शिंदे यांना उमेदवारी दिली गेली; पण तेथून राष्ट्रवादीचे आ. किरण लहामटे त्यांच्या बिनविरोधाला अडसर ठरले. अनु. जाती जमातीमधून भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचीही शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत यांच्या उमेदवारीने कोंडी केली.
कोपरगावच्या सोसायटी मतदारसंघातून सहकारातील जाणते नेतृत्व बिपीन कोल्हे यांनी बिनविरोधाची बाजी मारली, पण तेथील राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे बिनविरोधाचे मनसुबे सुधीर रावसाहेब म्हस्के यांच्या रूपाने धुळीस मिळाले. नेवाशातून माजी मंत्री शंकरराव गडाख हे सोसायटीतून बिनविरोध झालेच; पण समर्थक कारभारी जावळे यांच्यासाठी ओबीसीची जागा घेण्यात ते यशस्वी झाले. परिणामी नेवाशातून शिवसेनेचे आमदार असलेले विठ्ठलराव लंघे पाटील यांची बँकेची इच्छापूर्ती अधुरीच राहिली. सहकाराचे धडे गिरवू पाहणाऱ्या आ. लंघे यांचा आणि आ. काळे यांच्या बिनविरोधाच्या मनसुब्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ तर झाला नाही ना, अशीही शंका आहे. शेवगावातून माजी आमदार तथा सहकारातील मातब्बर शेखरभाऊ यांच्या पत्नी राजश्री घुले आणि पाथर्डीतून भाजप आमदार मोनिका राजळे दोघीही बिनविरोध जिल्हा बँकेच्या संचालिका झाल्या.
हेडमास्तरांचा अभ्यास अपुरा
प्रा. राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती. सभागृहात त्यांचे पद सर्वोच्च. त्या अर्थाने ते हेडमास्तर. मात्र सहकारातील त्यांचाही अभ्यास अपुरा पडल्याचे चित्र निर्माण झाले. कर्जत आणि जामखेडच्या जागांसह अन् ओबीसी व महिला जागेसाठी दावेदारी करणारे हेडमास्तर शिंदे यांचा प्रस्थापितांनीच ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची भावना त्यांच्याच समर्थकांमध्ये आहे. शिंदे यांच्या कर्जत-जामखेडमधील उमेदवारांविरुद्ध मंत्री विखे पाटील समर्थकांची उमेदवारीची पुष्टी शिंदेसमर्थक त्यासाठीच देत आहेत. प्रस्थापितांच्या पॅनलची घोषणा होण्याची वाट पाहणारे हेडमास्तर शिंदे यांना चौघांची उमेदवारी करण्याची झालेली घाई पाहता त्यांना ‘सहकार’च उमगला नाही, असे चित्र रंगवले जात आहे. अर्थात शिंदेंच्या उमेदवारांविरोधात उमेदवारी दिली गेली की उमेदवारांची घोषणा करण्याची घाई अंगलट आली? हे करेक्ट समजेनासे झाले.
आ. संग्राम जगताप मास्टर
आ. संग्राम जगताप यांच्यासाठी सहकाराचे पुस्तक नवे असले तरी ऑपरेशन करण्यात तरबेज असलेले डॉ. सुजय विखे पाटील त्यांच्या जोडीला. राम-लक्ष्मणाच्या (असे लोक म्हणतात) या जोडीने बिनविरोध न होणारी बिगरशेती मतदारसंघातील जागा बिनविरोध करत आ. जगताप यांचे बंधू सचिन यांच्यासाठी जिल्हा बँकेचा दरवाजा ओपन केला. सोबतच मेहुणे आमदार अक्षय कर्डिले यांच्याही बिनविरोधाचा मार्ग प्रशस्त केला. तीन टर्म आमदार राहिलेले संग्राम जगताप हे सहकारातील मास्टर म्हणून उदयास आले तर आश्चर्य वाटायाला नको. अर्थात सचिनभाऊंना बिनविरोध करण्यासाठी संग्राम-सुजय जोडीने अनेकांना घरी बसविण्याचा अनोखा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, हेही विशेषच..!