डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: महापालिकेतील सत्ताधारी, विरोधी पक्ष, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विविध धोरणात्मक बैठकांचे मुख्य केंद्र असलेल्या ऐतिहासिक 'राजमाता जिजाऊ सभागृहा'च्या नूतनीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सभागृहाच्या अद्ययावतीकरणासाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांची पाठपुरावा केला. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
महापालिकेची नवीन इमारत २००८ मध्ये उभारण्यात आली. त्या वेळीच त्यात सभागृह बांधले. त्यास राजमाता जिजाऊ सभागृह असे नाव देण्यात आले. अनेक वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या सभा, कार्यक्रम व वाढत्या वापरामुळे सभागृहातील अंतर्गत रचना, ध्वनी यंत्रणा, विद्युत व्यवस्था आणि आसनव्यवस्थेची मोठी दुरवस्था झाली होती. अनेक वेळ सभागृह सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यास काही काळ कामकाज थांबत होते. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, संपत बारस्कर, बाबासाहेब वाकळे, निखील वारे, कुमार वाकळे, सागर बोरूडे यांनी सभागृहाचे नूतनीकरण करण्याची मागणी केली होती.
प्रशासनाने या मागणीची दखल घेत सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करून जिल्हा नियोजन विकास निधी (डीपीडीसी)कडे दीड कोटीच्या निधीची मागणी केली. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरवा केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधीला मान्यता दिली. त्यातून सभागृहाचा कायपालट होणार आहे. सभांच्या वेळी साऊंड सिस्टीममध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी उत्तम यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तसेच, सादरीकरणासाठी आणि आभासी बैठकांसाठी मोठे 'एलईडी डिस्प्ले स्क्रीन' लावण्याचा प्रयत्न असेल.
अद्ययावत सेंट्रल एसी व लाईटिंग
सभागृहातील जुनी वातानुकूलित यंत्रणा बदलून नवीन ऊर्जा-बचत करणारी सेंट्रल एसी सिस्टीम बसवली जाईल. तसेच संपूर्ण सभागृहात आकर्षक आणि डोळ्यांना त्रास न देणारी आधुनिक 'एलईडी प्रोफाईल लाईटिंग' केली जाईल.
आरामदायी आसन व्यवस्था
सभागृहातील सध्याची आसन व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे आता नव्याने नगरसेवकांसाठी १२४ आरामदायी खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक आरामदायी, नवीन डिझाइनच्या खुर्च्या व टेबल बसवले जाणार आहेत.
सुरक्षा आणि आधुनिक सुविधा
अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा, अत्याधुनिक स्टेज, व्हीआयपी लाउंज आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र अद्ययावत मीडिया गॅलरीची व्यवस्था केली जाणार आहे. अग्निरोधक फॉल्स सीलिंग आणि आकर्षक कार्पेटिंग केले जाणार आहे.
राजमाता जिजाऊ सभागृह हे महापालिकेचे अस्मिता केंद्र आहे. काळाच्या गरजेनुसार सभागृह अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त असणे आवश्यक होते. दीड कोटी निधीतून हे सभागृह सर्वोत्कृष्ट बनवले जाईल व लवकरच ते नव्या रूपात सेवेत दाखल होईल.यशवंत डांगे, आयुक्त
महापालिकेली राजमाता जिजाऊ सभागृहात सुविधांची वाणवा होती. आता नूतनीकरण सुरू करण्याअगोदर कामाचा थ्रीडी, मोजमाप, कोणत्या प्रकारची लायटिंग व साउंड सिस्टीम बसविण्यात येणार आहे ते सभागृहासमोर सादर करावे. त्यानंतरच काम सुरू करावे.संपत बारस्कर, नगरसेवक
सभागृहाच्या नूतनीकरणाची अनेक दिवसांपासून मागणी होते. मध्यंतरी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सभागृहाची पाहणी करून खंत व्यक्त केली. निधी मंजूर झाल्याने पालकमंत्री विखे पाटील, आ. संग्राम जगताप, माजी खा. सुजय विखे पाटील यांचे आभार मानतो.ॲड. धनंजय जाधव, उपमहापौर