Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत शिंदे-लंकेंची एन्ट्री; बिनविरोधाच्या चर्चेला धक्का?

राम शिंदे, नीलेश लंके यांनी घेतले उमेदवारी अर्ज; सहाशेहून अधिक अर्जांमुळे निवडणूक बिनविरोध होण्याबाबत संभ्रम
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्हा बँक निवडणूक बिनविरोधासाठी झालेल्या बैठकीबाबत माहिती नसल्याचे खुद्द पालकमंत्री विखे पाटील सांगत आहेत. शिवसेनाही स्वबळाची तयारी करत आहे. बँकेच्या राजकीय घडामोडी पाहता सभापती म्हणून भूमिका घेण्याची वेळ आली की नाही? असा प्रश्न पडल्याचे सांगतानाच उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उडालेली झुंबड पाहता निवडणूक बिनविरोध होणार की नाही, असे सूचक भाष्य करत आगामी वाटचालीचे संकेतही दिले. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. प्रा. शिंदे हे बुधवारी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी स्वत: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पोहचले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Ahilyanagar District Bank
Dhorjalgav Water Shortage: ऐन पावसाळ्यात ढोरजळगावला पाणीटंचाई; ३ ते ४ किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ

प्रा. शिंदे म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू असली तरी प्रमुख नेत्यांच्या बोलण्यामध्ये एकसूत्रता राहिली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एखादा निर्णय करणार असताल तर सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. सर्वांना विचारात घेऊन निर्णय करायला हवं, असेही त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक आशिया खंडातील सर्वात मोठी बँक आहे. ठेवीदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. पीक कर्ज वितरणही चांगले झाले आहे. बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. ठेवीदार आणि आर्थिक संरक्षण करणे व शेतकऱ्यांना पाठबळ देणे कर्तव्य आहे. दुष्काळी परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मदतीची तयारी दर्शवली आहे. त्याचाही फायदा बँकेला निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Drought: नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; खरीप पिकांचे पंचनामे सुरू, धरणसाठाही ८३ टक्क्यांवर

दरम्यान, माझ्या मनधरणीचा प्रश्न येत नाही. नेत्यांनी त्याबाबत बोलले पाहिजे. मी काही बोलू शकत नाही. संगमनेरमध्ये बैठक झाली आणि त्यामध्ये बिनविरोध करण्याचा निर्णय झालेलाही असेल. मात्र, असे असले तरी सभासदांनी सहाशेच्यावर उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यावरून बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होतं, असे सूचक भाष्यही त्यांनी केले.

लंकेंसोबत दत्ता पानसरे

विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठोपाठ खासदार नीलेश लंकेही जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याकरीता स्वत: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पोहचले. खा. लंके यांच्यासोबत श्रीगोंद्याचे नेते दत्ता पानसरे यांच्या उपस्थितीने चर्चेला पुन्हा फोडणी मिळाली आहे. समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल करत रणनिती आखली जात असल्याची माहिती समोर येत असून काय घडेल हे शेवटच्या क्षणापर्यंत कळणार नसल्याचे चित्र निर्माण होवू पाहत आहे.

संगमनेरमधील विखे-थोरात समझोता बैठकीपासून सभापती शिंदे व खा. लंके यांना दूर ठेवण्यात आले होते. त्यानंतर अर्जासाठी होणारी झुंबड पाहता सहकारातील प्रमुख नेत्यांनी ठरवले तरी अस्तित्व दाखविण्यासाठी विस्थापीत नेत्यांची चाल असल्याचे समोर येत आहे. राजकीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठीचा हा दबावाचा भाग की खरेच निवडणूक लढणार याची चर्चा सुरू झाली आहे.

Ahilyanagar District Bank
Dilip Khedkar Disproportionate Assets: पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या पाथर्डीतील घरावर एसीबीची झाडाझडती; १३ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

लढायचे नक्की, पण...!

जिल्हा बँकेची निवडणूक लढवायची आहे, पण बिनविरोधाच्या चर्चांमुळे माझ्या मनामध्ये अजून तोच प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्र्यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. बिनविरोध संदर्भातील बैठकीबाबत काही माहीत नाही असेही मंत्री विखे पाटील म्हणतात. शिवसेनेनेही बैठक घेतली आहे. सभापती म्हणून मला भूमिका घेण्याची वेळ अजून आली की नाही असा प्रश्न मला पडला आहे. सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच फॉर्म घेतलेला आहे. आणखी विचार करूनच फॉर्म भरला जाईल. सहकारी कारखान्यांवर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. ज्यांच्या कारखान्यावर कर्ज आहे, त्यांनाच विचारणा केली पाहिजे. मी कुठल्याही संस्थेचा थकबाकीदार नाही, असेही प्रा. शिंदे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

कर्जतचे ‘राम’दूत देवदर्शनाला

जिल्हा बँक उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील ५७ मतदारांना सहलीवर रवाना केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. प्रा. शिंदे कर्जतमधून लढणार की जामखेडमधून हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बँकेच्या राजकारणात दगाफटका नको म्हणून त्यांनी मतदारांची विशेष काळजी घेण्यास सुरूवात केली आहे. सभापती प्रा.शिंदे यांनी सहकार क्षेत्रात नवखे असले तरी ते मुरब्बी राजकारण्याप्रमाणे डावपेच टाकत आहेत. जामखेड तालुक्यातील मतदारांची बैठक घेतल्यानंतर कर्जतमध्ये बुधवारी बैठक झाली.

कुळधरण व राशीन गटातील मतदारांची कर्जत शहरात प्रा. राम शिंदे यांनी बैठक घेतली. बैठकीला उपस्थित २२ मतदार तेथूनच सहलीवर रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान मंगळवारी माहिजळगाव येथील बैठकीत ३३ मतदारांची बैठक घेतली होती. कर्जत तालुक्यात सोसायटी मतदारसंघात ७५ मतदार आहेत. त्यातील ५७ ‘रामदूत’ मतदार देवदर्शनासाठी गेल्याचे सांगण्यात येते.

बैठकीत प्रा. शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भातील घडामोडी व रणनितीबाबत मतदारांशी संवाद साधला. कर्जतमधून उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट नसले तरी कोणतीच रिस्क नको म्हणून मतदारांची सुरक्षा जोपासली जात असल्याचे दिसून येते. स्वत: राम शिंदे उमेदवार असतील की आणखी कोणाला संधी देणार, आमदार रोहित पवार काय भूमिका घेणार?, याकडे कर्जत-जामखेडच नव्हे तर जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागून आहे.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Fake Currency Gang: ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष; बनावट नोटांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद

शिंदे यांच्याशी चर्चेसाठी थोरातांच्या मदतीला कोल्हे!

सभापती राम शिंदे यांची मनधरणी करण्याची जबाबदारी स्वतः ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतली असतानाच आता त्यांच्या मदतीला आमदार विवेक कोल्हे आले आहेत. हे दोघे नेते सभापती शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. या चर्चेत राजकीय वाटाघाटी कशा होतील याबाबत उत्सुकता असणार आहे.

बुधवारी...

प्रशांत सभाजीराव गायकवाड यांनी बिगर शेती आणि ओबीसी प्रवर्गातून आणि संजयकुमार कर्नावट यांनी बिगरशेती मतदारसंघातून अर्ज दाखल केला. महिला राखीव मतदारसंघातून पाथर्डीच्या चंदा गंगाधर गर्जे, इतर मागास प्रवर्गातून जामखेडचे आजिनाथ हजारे यांनी अर्ज दाखल केले आहेत. योगिता बाळासाहेब ताटे (रा. चितळी, ता.पाथर्डी) यांनी उमेदवारी अर्ज नेला.

शेतकरी हित, सहकार क्षेत्राचे बळकटीकरण आणि जिल्हा बँकेच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य देण्याची भूमिका आहे. सहकारातील ज्येष्ठ नेत्यांनी ज्या विश्वासाने बँकेचा कारभार केला, तो विश्वास जपत बँकेच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी सहकार क्षेत्राने अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज आहे. वैयक्तिक मतभेद आणि राजकीय मतभिन्नता बाजूला ठेवून शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. सहकार मजबूत करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

सभापती प्रा. राम शिंदे.

संगमनेरातील बैठकीची माहिती नव्हती. व्यक्ती द्वेषातून राजकारण केले जात आहे. मी कारखानदार नसलो तरी माझ्या मतदारसंघातही कारखानदारी आहेच. उमेदवारी अर्ज घेतला, उद्या दाखल करू, त्यानंतर भूमिका स्पष्ट करू.

नीलेश लंके, खासदार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news