

दीपक ओहोळ
नगर: पावसाअभावी यंदा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची वेळ शासनावर आली. मात्र, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुबलक पावसाने ८ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान होऊन, बाधित शेतकर्यांना अनुदान वितरित करावे लागले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६५ टक्के पाऊस कमी झाला असून, पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक शेतकर्यांच्या बांधावर फिरु लागले आहेत.
गेल्या वर्षीदेखील ऑगस्टअखेरपर्यंत सरासरी २६८ मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा सरासरी २५४ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तुफान पाऊस झाला. २९ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाभरात १३१ टक्के म्हणजे ५८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसाने शेतशिवारात पाणीच पाणी केले होते. काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीबरोबरच रब्बी हंगामी पेरणी दीड महिना लांबली पडली होती. एकंदरीत ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यात आले.
पंचनाम्यात जवळपास ८ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे पुढे आले. त्यामुळे या बाधित शेतकर्यांना हेक्टरी अनुदान वाटप करण्याची वेळ शासनावर आली होती. यंदा शंभर टक्के पेरणी झालेल्या पिकांच्या वाढीसाठी तसेच शेंगा भरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, यंदाचा सप्टेंबर महिन्यात फक्त ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दमदार पावसाअभावी पिके जळून गेली. सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि मोठ्या प्रमाणात झालेला पावसाचा खंड हे दोन मुदृ धरुन शासनाने यंदा दुष्काळी परिस्थिती जाहीर केली. पावसाअभावी खरीप पिके वाया गेलेल्या शेतकर्यांना आता हेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. पंचनामे झाल्यानंतर दिवाळीपूर्वी बाधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार आहे.
महिनाभरात ४.८ टीएमसी वापर; ८३ टक्के पाणी शिल्लक
दमदार पावसाअभावी खरीप पिकांसाठी गेल्या महिनाभरात धरणांतून ४ हजार ८५२ दलघफू पाण्याचा वापर झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मुळा धरणातील ३ हजार ८०१ दलघफूचा समावेश आहे. आजमितीस जिल्ह्यातील नऊ धरणांत ४२ हजार ४४३ दलघफू म्हणजे ८३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा संपल्यात जमा असल्याने आता हेच पाणी ३१ जुलै २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असली तरी धरणांच्या पाणलोटात जोमदार पाऊस होऊन भंडारदरा, निळवंडे,आढळा ही धरणे ओव्हर फ्लो झाली. मुळा धरणदेखील ९५ टक्के भरले. उर्वरित सीना, मांडओहळ, घाटशीळ व खैरी आदी धरणे ५०-६० टक्के रिकामीच राहिली आहेत. मात्र, लाभक्षेत्र व इतर जिल्हाभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि दीर्घ खंड पडल्यामुळे खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणातून आवर्तन सोडावे लागले. सध्या मुळा धरणातून आर्वतन सुरुच आहे.
सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस कसर भरुन काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबर महिना कोरडाच गेला आहे. त्यामुळे खालावलेली भूजलपातळी भरली गेली नाही. त्यामुळे आगामी दोन तीन महिन्यांत विहिरी व कुपनलिका कोरड्याठाक दिसणार आहेत. त्यामुळे लवकरच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात ९२ टक्के म्हणजे ४७ हजार ४८ दलघफू इतका पाणीसाठा होता. खरीप पिके वाचविण्यासाठी मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणांतून वेळोवेळी पाणी सोडण्याची वेळ आली. महिनाभरात जवळपास ४ हजार ८५२ दलघफू म्हणजे पाच टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२८) सकाळपर्यंत नऊ धरणांत ४२ हजार ४४३ दलघफू (८३ टक्के )इतकाच पाणीसाठा आहे. रब्बी पिके याच धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे रब्बी पिकांना आवर्तन सोडताना मोठी दमछाक होण्याची शक्यता आहे. आगामी पावसाळा लांबल्यास पिण्याच्या पाण्याची मागणी वाढणार आहे. पाणी वापर (दलघफू) : निळवंडे : ७२१, मुळा : ३८०१, घाटशीळ : ५४, सीना : १३१, खैरी : १६.४९
१६१० गावांत होणार पंचनामे
जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक या तीन अधिकार्यांची नियुक्ती केली. त्यांच्या समवेत पोलिस पाटील, सरपंच, विकास सोसायटी अध्यक्ष वा गावातील प्रतिष्ठत नागरिकांचे मंडळ असणार आहे. जवळपास १ हजार ६१० गावांतील पिकांचे पंचनामे होणार आहेत. यासाठी ग्रामीणस्तरावरील पाच हजार कर्मचारी तैनात करण्यात आले असून, मंगळवारपासून (दि.२९) काही गावांत पंचनामे सुरु झाले आहेत. एक दोन दिवसांत या कामाला वेग येणार आहे.