राहुरी: नगर-मनमाड राज्य महामार्गावर आज सकाळी भरधाव मालट्रक थेट राहुरी बसस्थानकासमोरच्या टपऱ्या व दुकानांमध्ये घुसला. क्षणातच आरडाओरडा, धूळ आणि भगदाडाचे दृश्य निर्माण झाले. तीन टपऱ्या अक्षरशः जमीनदोस्त झाल्या. दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
मालट्रक (जीजे 10 टीएक्स 9244) सकाळी सुमारे 7 वाजता राहुरी फॅक्टरीकडून नगरच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. अवघ्या काही सेकंदांत ट्रक थेट बसस्थानकासमोरच्या टपऱ्यांवर आदळला.
सुदैवाने सकाळची वेळ असल्याने दुकाने उघडली नव्हती. अन्यथा मोठी जीवितहानी अटळ होती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले, संदीप ठाणगे, पोलिस नाईक जयदीप बडे यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था, अपूर्ण कामे आणि काही ठिकाणची एकेरी वाहतूक याविषयी संताप व्यक्त केला.
आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार? असा सवाल प्रवासी व व्यापारी वर्गातून उपस्थित होत असून, महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे व धोकादायक ठिकाणी बॅरिकेडिंग करावे, अशी मागणी होत आहे.