राहुरी: तालुक्यातील कापूस खरेदी हंगामाला सुरुवात झाली आहे. कापसाची काटामारी, व्यापाऱ्यांची मनमानी, तर प्रशासनाची निष्क्रियता या मुद्यांवरून अखेर शेतकऱ्यांचा संयम सुटला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी थेट व्यापाऱ्यांना धारेवर धरले. कापसाची लूट थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला. कापसाची वजनात काटामारी, दरात घट, यामुळे शेतकऱ्यांनी संतापाचा सूर आळवला. (Latest Ahilyanagar News)
अवकाळीसह परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा बिकटवेळी कापूस विक्रीत व्यापाऱ्यांकडून वजनात घट धरली जाते. दरातही तफावत निर्माण केली जात आहे. यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडले आहेत. याविरोधात रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने येथील बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रखर रोष व्यक्त केला.
बैठकीसाठी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार नामदेव पाटील, रवींद्र मोरे, प्रकाश देठे, ईश्वर सुराणा, सचिन उदावंत, राजेश चोरडिया, राजेंद्र कोकाटे, अंबादास म्हसे, अमोल आडसुरे, नवनीत चोरडिया, नुरमोहम्मद आतार, राहुल उदावंत, अनिल पटारे, अमोल दुशिंग, दत्तात्रय दुशिंग, तेजस कदम, विकास लांबे, रामकृष्ण जगताप, सुरेश थेवरकर, राहुल वाकचौरे, आदिनाथ झिने, जितेंद्र शेळके, सहर्ष गाडे, महेश वराळे आदींसह शेतकरी, व्यापारी व अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका दरवर्षी कापसातील वजन मापातील तफावत, व्यापाऱ्यांची मनमानी अशातच अधिकाऱ्यांची निष्क्रियता दिसते. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. शासनाने केवळ सूचना देणे थांबवा. प्रत्यक्ष अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, अन्यथा व्यापाऱ्यांना तोंडाला काळे फासणार आहे, असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे रविंद्र मोरे यांनी दिला.
अधिकाऱ्यांना काळे फासणार
महसूलसह ए.आर. कार्यालयाला आठ दिवसांपूर्वीच तक्रार केली. तरीही वजन मापे पथकाने व्यापाऱ्यांचे काटे तपासले नाहीत. व्यापाऱ्यांची मनमानी सुरूच आहे. याबाबीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासणार आहे, असा इशारा प्रकाश देठे यांनी दिला आहे.
दोन दिवसांत काटे तपासणी करा
येत्या दोन दिवसात सर्व काटे पासिंग करून घ्या. काट्यात तफावत आढळल्यास पोलिस बंदोबस्तात थेट कारवाई केली जाईल, असे निर्देश तहसीलदार नामदेव पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिले.