

राहुरी: राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर दावेदार इच्छुकांचा हिरमोड झाला असतानाच विकास मंडळाचे चाचा तनपुरे यांनी गुप्त बैठका सुरू केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान चाचा तनपुरे यांच्या विकास मंडळाने स्वबळाचा नारा दिल्यास राहुरीत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Latest Ahilyanagar News)
गत चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका जाहीर झाल्याने आजी-माजी नगरसेवक आणि नवोदित उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्ष आणि गटांत मोर्चेबांधणीला वेग आला असून, उमेदवारी कोणाला मिळणार? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच भाजप आमदार स्व. शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे यांनी युवा नेते अक्षय कर्डीले यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी नगरपालिकेचा गड खालसा करण्यासाठी एकीकडे भाजप नियोजन करत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षात असलेले विकास मंडळाचे रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. त्यामुळे ते काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे.
चाचा तनपूरे यांच्या नेतृत्वाखालील विकास मंडळाने शहरात शुक्रवारी सायंकाळी येवले आखाडा येथे बैठक घेतली. या बैठकीत नगरपरिषद निवडणुकीच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. मात्र, विकास मंडळ स्वतंत्र लढणार की माजी मंत्री तनपूरे गटाशी युती करणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
विकास मंडळ आणि तनपूरे गटात युती होणार की दोघे स्वतंत्र रस्ता निवडला जाणार, याकडे शहरातील मतदारांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या हालचालींमुळे राहुरी नगरपरिषद निवडणूक चुरशीची, रंगतदार आणि समीकरण बदलणारी ठरेल, असे चित्र आहे.
नगरपालिकांचे आरक्षण जाहीर होताच राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होत असल्याचे चित्र आहे. राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद एसटी प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित होताच सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले. 12 प्रभागातून 24 नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यात 12 जागा महिलांसाठी राखीव असणार आहे.
तनपुरेंच्या मनोमिलनाने मनोबल वाढेल
विधानसभा निवडणुकीत विकास मंडळाने माजी मंत्री प्राजक्त तनपूरे गटाशी युती केली होती. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही तनपुरेंची पुन्हा युती झाल्यास तनपूरे गटाची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीकडून स्वतंत्र पॅनल उभे राहणार असल्याची माहिती मिळाली असून, त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता अधिक आहे.