आश्वी: संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात सकाळी एक थरारक घटना घडली. शेतात पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक प्राणघातक हल्ला चढवला. मात्र, शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. बबन तुकाराम आंधळे (वय 50) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर सध्या संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
निमगावजाळी ते प्रतापपूर रस्त्यावरील मानमोडे बाबा मंदिरापासून काही अंतरावर बबन आंधळे यांची शेती आहे. मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ते आपल्या शेतात नुकत्याच पेरणी केलेल्या मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. याचवेळी शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या शेजारील झुडपात दबा धरुन बसला होता.
याबाबत सेवानिवृत्त प्राध्यापक बाळासाहेब आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन आंधळे हे मका पिकाला पाणी देत असतानाच बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्याने काही काळ गोंधळ उडाला, पण आंधळे यांनी प्रतिकार करताच, बिबट्याने तिथून धूम ठोकली.
बिबट्याशी झालेल्या या झटापटीत बबन आंधळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर, पाठीवर, कंबरेवर, पोटावर बिबट्याच्या नखांमुळे खोलवर जखमा झाल्या आहेत. रक्ताने माखलेल्या आंधळे यांना तातडीने संगमनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील बिबट्याचा वावर पाहता आणि पुन्हा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन, वनविभागाने तत्काळ घटनास्थळी गट नंबर 321 मध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
‘तो’ हल्लेखोर बिबट्या जेरबंद ?
वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी मध्यरात्री एक बिबट्या जेरबंद झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास वनविभागाने या बिबट्याला सुरक्षित स्थळी हलविले आहे. दरम्यान, जेरबंद झालेला बिबट्या हा हल्लेखोर बिबट्याच आहे का? याबाबत संभ्रम कायम असून या परिसरात आणखी बिबट असण्याची शक्यता आहे.