

नगर: आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी उत्साहात पार पडल्या. यावेळी इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करत मोठा प्रतिसाद दिला.
या निमित्ताने पक्षात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असून शिवसेना निवडणुकांना अत्यंत ताकतीने सामोरी जाणार असल्याचे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महानगरप्रमुख किरण काळे यांनी म्हटले आहे.
शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या मुुलाखतींमध्ये मनपासाठी 217, जिल्हा परिषदेसाठी 98, पंचायत समितीसाठी 141 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले.
किरण काळे म्हणाले, मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला महाविकास आघाडी करण्याचा प्रस्ताव आम्ही यापूर्वीच दिला आहे. त्याची एक बैठक झाली आहे. मविआचे खा. नीलेश लंके यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आम्ही आघाडीसाठी सकारात्मक आहोत.
राजेंद्र दळवी म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद इच्छुकांनी दिला आहे. प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती वेगळी आहे. ज्या ठिकाणी शिवसेना सक्षम आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी आमचा आग्रह राहणार आहे.