

nstagram Reelstar Komal Kale Arrest
नगर/पाथर्डी : खरे तर ती सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिद्ध. तिचे पन्नास हजारांवर फॉलोअर्स. पण तिचा खरा ‘उद्योग’ होता एसटी बसमध्ये महिला प्रवाशांना लुबाडण्याचा, भोळेपणाचा आव आणून सोन्याचे दागिने, पर्स चोरण्याचा... शेवगाव-पाथर्डी परिसरातील ही ‘बबली’ चोरीचे पैसे आणि दागिने आपल्या प्रियकराकडे म्हणजे ‘बंटी’कडे ठेवायची. अनेक तक्रारींनंतर अखेर या ‘बंटी और बबली’ला स्थानिक गुन्हे शाखेने चतुर्भूज केले.
कोमल नागनाथ काळे (वय 19, रा. शेवगाव) आणि सुजित राजेंद्र चौधर (वय 25, रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) अशी त्यांची नावे आहेत. यात कोमल हीच ही चोऱ्यांमधील मास्टरमाइंड असून, तिने प्रियकराच्या मदतीने चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.
याबाबत माहिती अशी ः दि. 19 नोव्हेंबर रोजी दुपारी अलका मुकुंद पालवे (रा. देवराई, ता. पाथर्डी) पाथर्डी ते कल्याण एसटी बसने प्रवास करीत असताना, त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली. अशा अनेक तक्रारी आधीही आल्या होत्या. त्यामुळे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक नेमून जिल्ह्यातील बसमधील व बसस्थानक परिसरातील चोऱ्यांचा तपास सुरू केला.
या तपासात पाथर्डीतील नवीन बसस्थानक परिसरात संबंधित चोरीतील संशयित महिला फिरत असल्याची पथकाला खबर मिळाली. पथकाने सापळा लावला आणि त्यात कोमल अडकली. लुटण्यासाठी नवे सावज शोधत असतानाच कोमलला पथकाने पकडले. कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेला मुद्देमाल प्रियकर सुजित चौधरी याच्याकडे दिल्याचे सांगितले.
पथकाने सुजितचा शोध घेतला. तो शेवगाव येथील घरीच सापडला. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. कोमलने बसमधील महिलांच्या पर्स कापून चोरी केलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम सुजितकडे ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्याने महागड्या मोबाईलसह एकूण 9 लाख 35 हजार 230 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला.
कोमल व सुजित यांनी अमरापूर ते शेवगाव बसमध्ये महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले. पाथर्डी ते भगूर बसमधूनही एका महिलेच्या पर्समधून चोरी केल्याचे कबूल केले. कोमलविरुद्ध बीड व अहिल्यानगर जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल आहेत. सुजितनेही घरफोडी, दरोडा, जबरी चोरीसह 8 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार सुरेश माळी, विष्णू भागवत, फुरकान शेख, दीपक घाटकर, भीमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रकाश मांडगे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, भगवान थोरात, जालिंदर माने, महिला अंमलदार वंदना मोडवे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, ज्योती शिंदे, सोनाली भागवत, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी कोमल काळे ही रीलस्टार असून सोशल मीडियावर तिला 50 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याचे समजले. दरम्यान, बसमध्ये प्रवास करताना कोणत्याही अनोळखी, भोळ्या चेहऱ्याच्या महिला व व्यक्तींवर, विशेषतः ‘फ्रेंडली’ व ‘इन्फ्लुएंसर’ स्वरूपात वावरणाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका; तसेच प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची, सामानाची दागिन्यांची काळजी घ्या, असे आवाहन पोलिसांनी केलेे आहे.