

नगर : मतदान प्रक्रिया पूर्ण झालेल्या आठ नगरपालिकांची मतदान यंत्रे तालुका ठिकाणी स्ट्रॉगरुममध्ये ठेवण्यात आलेली असून, त्या ठिकाणी द्विस्तरीय सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असून, आठ अधिकाऱ्यांची सुरक्षाव्यवस्थेचे पर्यवेक्षण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
आठ नगरपालिकांची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या पालिकांची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मंगळवारी (दि.2) रात्रीच प्रत्येक नगरपालिकाची मतदान यंत्रे आपापल्या तालुक्यातच स्ट्रॉगरुममध्ये ठेवण्यात आली आहेत. स्ट्रागरुम असलेल्या इमारतीभोवती द्विस्तरीय सुरक्षाव्यवस्था तैनात असून, पहिल्या स्तरावर राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तर दुसऱ्या स्तरामध्ये पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सहा सशस्त्रधारी पोलिसाचा पहारा असणार आहे. मतदान यंत्र ठेवलेल्या इमारतीच्या अंतर्गत व बाह्य परिसरात 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे.
याठिकाणी अधिकृत ओळखपत्र असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनाच एन्ट्री असणार आहे. सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळेत अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशामक यंत्रणा, बंदोबस्त, लॉक आदी सुव्यवस्थित आहेत का आदींचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे.
राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना ज्या ठिकाणी स्ट्रॉगरुम ठेवले आहेत. त्या गोडाऊनची आणि सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यास मुभा आहे. तसेच उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना मतदान यंत्र ज्या ठिकाणी ठेवले त्या इमारतीचा दरवाजा दिसेल त्या ठिकाणी बसण्याची जागा निश्चित करुन देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करता यावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लाईव्ह स्क्रिनवर पाहण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी उमेदवार किंवा अधिकृत प्रतिनिधींना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे.
श्रीरामपूर : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
संगमनेर : बॅडमिंटन हॉल, क्रीडा संकुल
राहाता : राहाता नगरपालिका प्रशासकीय इमारत
शिर्डी : श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था
राहुरी : रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय, राहुरी
शेवगाव : तहसील कार्यालय, शेवगाव
श्रीगोंदा : धान्य गोडावून, श्रीगोंदा
जामखेड : श्री नागेश्वर सभागृह.