पाथर्डी: अहिल्यानगर शहरातील एका व्यापाऱ्याला लुटण्याचा तसेच एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या पुणे जिल्ह्यातील टोळीचा पाथर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपी व्यापाऱ्याची रेकी करीत होते. तर, एका व्यक्तीच्या हत्येची सुपारीही घेतल्याचे तपासात पुढे आले. पाचपैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, दोघे फरार आहेत, अशी माहिती पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली.
पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. अनिकेत शामवेल शिंदे (वय 22, रा. शितलानगर, देहूरोड, पुणे) याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पाचही आरोपी पुणे जिल्ह्यातील असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत.
शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात रविवारी मध्यरात्री दुचाकी चोरी व मारहाणीची घटना घडली. अमिर हबिब शेख (रा. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 21 फेब्रुवारी रोजी त्यांनी दुचाकी घरासमोर उभी केली होती. दि. 22 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 वाजता बाहेर आले असता पाच अनोळखी व्यक्ती दुचाकीजवळ संशयास्पद हालचाली करताना दिसले.
जाब विचारताच दोघांनी त्यांना मारहाण केली, तर एका आरोपीने गावठी कट्टा डोक्याला लावून धमकी दिली. खिशातील पैसे काढून तिघांनी दुचाकी पळवून नेली. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. स्थानिक माहिती, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींकडून धक्कादायक बाबी समोर आल्या. अहिल्यानगर शहरातील एक व्यापारी दररोज लाखो रुपयांची रोकड दुकान बंद केल्यानंतर घरी घेऊन जात असल्याची माहिती मिळवून आरोपींकडून त्याची रेकी करण्यात आली होती.
योग्य संधी साधून लूटमार करण्याचा त्यांचा बेत होता. याशिवाय एका व्यक्तीच्या हत्येची सुपारी घेतल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली. त्यामुळे ही टोळी केवळ चोरी-लूटमारपुरती मर्यादित नसून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी लूट आणि हत्येचा कट उधळण्यात यश आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करीत आहेत.