

सोनगाव: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांनी सोनगाव व परिसरात स्मार्ट मीटरच्या माध्यमातून थकबाकीदार ग्राहकांवर डिजिटल कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई येथील नियंत्रण कक्षातून रिमोट प्रणालीद्वारे वीजजोडण्या खंडित करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
दीर्घकाळ वीजबिले थकीत असलेल्या ग्राहकांना वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ‘एक क्लिक’वर जोडण्या तोडण्यात आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार काही ग्राहकांची थकबाकी लाखोंमध्ये आहे. नियम सर्वांसाठी समान, असा ठाम संदेश देत महावितरणने डिजिटल युगातील कठोर कारवाईची झलक दाखवली आहे.
मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक कुटुंबे अंधारात गेली. सध्या परीक्षाकाळ सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाल्याची तक्रार पालकांनी केली. ग्रामीण भागात ऑनलाईन व्यवहारातील अडचणी व नेटवर्क समस्यांचा विचार करून कारवाईत मानवी दृष्टीकोन ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले की, थकीत रक्कम तत्काळ भरल्यास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. भविष्यातही स्मार्ट मीटर व रिमोट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, काही ग्राहकांनी अद्याप स्मार्ट मीटर बसविले नसल्याने त्यांचे बिल जुन्या पद्धतीनेच राहणार का, वसुली कशी होणार, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच महावितरण कर्मचाऱ्यांकडून मेसेज व स्टेट्सद्वारे वीजबिले वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात येत असून, मुंबई नियंत्रण कक्षातून रिमोट प्रणालीद्वारे जोडण्या खंडित केल्या जात असल्याची माहिती ग्राहकांना दिली जात आहे. डिजिटल कारवाईचा हा धडाका पुढे किती व्यापक होणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.