

लोणी: भंडारदारा, निळवंडे, मुळा आणि कुकडी प्रकल्पातील पाण्याचे सुयोग्य नियोजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याने यंदाच्या वर्षी जिल्ह्याला पाणी टंचाईची तीव्रता भेडसावताना दिसत नाही. उन्हाच्या तीव्रतेतही टंचाईग्रस्त गावांना आवर्तनाच्या माध्यमातून पाण्याचा मिळालेला दिलासा प्रशासनाचा ताण कमी करणारा ठरत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याने नेहमीच पाण्याचा संघर्ष अनुभवला आहे. अनेक वेळा सरासरी इतकाही पाऊस न होण्याचे प्रसंग जिल्ह्याने अनुभवले. त्यातच धरणात पाणी असूनही आवर्तनाचे नियोजन न झाल्याचे परीणाम सुध्दा जिल्ह्याला भोगावे लागले. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या संघर्षाला जिल्ह्याने मागील काळात तोंड दिले.
यंदा मात्र जिल्ह्यात पावसाने सरासरी इतकी हजेरी लावल्याने भंडारदारा, निळवंडे, मुळा धरणात पाण्याचा साठा क्षमते इतका उपलब्ध झाला. योगायोगाने यावर्षी जलसंपदा विभागाचे मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला मिळाल्याने पाण्याच्या संदर्भात अतिशय संवेदनशीलपणे धरणातील पाण्याचे नियोजन योग्य आणि वेळनुसार झाल्याचा अनुभव आला. सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. प्रशासकीय स्तरावर टंचाई आराखड्याचे नियोजन सुरू झाले असले तरी जिल्हयातील धरणामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि अद्यापही लाभक्षेत्रातील ओढे, नाले, तलावांमध्ये पाणीसाठा असल्याने गावांमधून पाण्याची मागणी नाही. जलसंपदा विभागाने मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक धरणाच्या लाभक्षेत्रातील पाण्याचे आवर्तन सुध्दा शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे झाले आहे. त्याचा लाभ शेती क्षेत्राबरोबरच कालव्यांवर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नाही.
पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन झाल्याने अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे असलेली टॅंकंरची मागणी यंदाच्या वर्षी घटल्याचे दिसते. यामुळे प्रशासनाचा ताण थोड्याफार प्रमाणात कमी झाला. पर्यायाने शासनाचा आर्थिक भुर्दंड वाचला आहे. तरीही प्रशासनाने तालुका निहाय टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्याची पुर्व तयारी करुन ठेवली आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आवर्तन
सद्य परिस्थितीत जिल्ह्यातील धरणांच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू केल्याने याचाही दिलासा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतीक्षेत्राला मिळाला आहे. उत्तर अहिल्यानगरचा विचार केला तर, भंडारदरा आणि निळवंडे या दोन्हीही धरण समुहातील पाण्याचा लाभ जिरायती भागाला मिळाला आहे. त्यात अधिक जमेची बाजू म्हणजे वर्षानुवर्षे निळवंडे कालव्यातून मागील दोन वर्षात आवर्तन वेळेवर सुरु झाल्याने उत्तर भागातील सहा तालुक्यातील दुष्काळी गावांना आता मोठा दिलासा मिळू शकला आहे.
50 वर्षानंतर पहिल्यांदाच गावतळे भरले
लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून, मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या आधिकाऱ्यांच्या सहकार्याने केलेले अचूक नियोजन यापुर्वी कधीही अनुभवास मिळाले नव्हते. त्यामुळे सध्या निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील ओढ्या, नाल्यांच्या माध्यमातून सोडून गावातील तळ्यांमध्येही साठविले गेले. हे मागील 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असल्याने या भागातील शेती उत्पादन वाढण्यासही मदत झाली आहे.
कुकडीतूनही उन्हाळी आवर्तन प्रस्तावित
यापुर्वी कुकडीचे पाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभक्षेत्राला मिळण्यात जाणीवपूर्वक राजकीय अडचणी निर्माण केल्या जात होत्या. मात्र जिल्ह्याकडे जलसंपदा विभाग आल्यानंतर प्रथमच कुकडीच्या कालवा सल्लागार समितीची बैठक ही अहिल्यानगरमध्ये झाली. त्यानंतर या लाभक्षेत्रातील आवर्तनाचे नियोजन झाले. सद्य परिस्थितीत कुकडी धरण समुहात 27.89 टिएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यानंतर पहिले रब्बी आवर्तन कुकडीच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आले. याचाही लाभ जिल्ह्याला झाला. उन्हाळी आवर्तन डाव्या कालव्यातून व इतर कालव्यांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.
जिल्ह्याची तहाण भागली
सद्य परिस्थितीत निसर्गाने दिलेली साथ तसेच अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी जायकवाडीकडे झेपावल्याने जायकवाडी धरणात क्षमतेपेक्षा जादा साठा झाला. योगायोगाने जलसंपदा विभागाचे मंत्रीपद जिल्ह्याला मिळाल्याने मंत्री विखे पाटील यांनी उपलब्ध पाण्याचे केलेले नियोजन जिल्ह्यासाठी हितकारक ठरले आहे. जिल्ह्याची तहाण तर भागलीच परंतु धरणातही चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे.
भंडारदरा-निळवंडे धरण
रब्बी हंगामात बिगरसिंचनासाठी एक व सिंचन, बिगर सिंचनासाठी एक अशी दोन आवर्तन सोडण्यात आली. त्यात अनुक्रमे 316 व 1609 दलघफु पाणीवापर झाला. सद्यस्थितीत दि.13.फेब्रुवारीपासुन सिंचन, बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले. तसेच निळवंडे धरणातून आजपर्यंत कालव्यांकरीता 1667 दलघफु पाणी वापर झाला.
मुळा प्रकल्प
रब्बी हंगामात मुळा डाव्या कालव्याकरीता एक आवर्तन सोडण्यात आले. त्यात 217 दलघफु पाणीवापर झाला. सद्यस्थितीत दि.23 फेब्रुवारी 2026 पासुन आवर्तन सोडण्यात आले आहे.
आढळा
रब्बी हंगामात 1 आवर्तन सोडण्यात आले. त्यात 89 दलघफु पाणी वापर झाला. सद्यस्थितीत दि.21 फेब्रुवारी 2026 पासुन आवर्तन सोडण्यात आले आहे.
मांडओहोळ
रब्बी हंगामात एक आवर्तन सोडण्यात आली. त्यात 107 दलघफु पाणी वापर झाला. सद्यस्थितीत दि.17 फेब्रुवारी 2026 पासुन आवर्तन सोडण्यात आले आहे.
घाटशिळ पारगाव
रब्बी हंगामात एक आवर्तन सोडण्यात आले. त्यात 81 दलघफु पाणीवापर झाला. सद्यस्थितीत दि.11 फेब्रुवारी 2026 पासुन आवर्तन सोडण्यात आले आहे.
ल.पा.प्रकल्प व को.प.बंधारा
रब्बी हंगामात सांगवी व पाडोशी ल.पा.प्रकल्पातून आवर्तनासाठी 45 दलघफु पाणीवापर झाला. सद्यस्थितीत लोहारे, कासारे, घोटी शिळवंडी, बलठण, शिरपुंजे या ल.पा.प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले आहे.