पाथर्डी: गंभीर गुन्ह्यात आरोपींना मदत करण्याचे आमिष दाखवून तसेच गुन्ह्याची कलमे सौम्य करण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती दोन लाख १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या पाथर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई शनिवारी (दि. १९) सायंकाळी पाथर्डी पोलिस ठाण्याजवळील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली. विनोद शिवाजी मासाळकर (वय ३७) असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर १८ सप्टेंबर रोजी पथकाने प्राथमिक पडताळणीची कारवाई सुरू केली. संबंधित पोलिसाने एका गंभीर गुन्ह्यात कठोर कलमे न लावता तुलनेने सौम्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
पडताळणीदरम्यान लाचेच्या मागणीबाबत संभाषण झाल्यानंतर तडजोडीअंती दोन लाख १५ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर सापळा रचण्यात आला. शनिवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना विनोद मासाळकर यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. मासळकरला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने ही कारवाई केली.
मी काहीतरी मॅनेज करतो...
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार मासाळकर तक्रारदाराकडे म्हणाला की, साहेबांशी बोलून मी काहीतरी मॅनेज करतो आणि रॉबरी आणि हाफ मर्डरपेक्षा ३२४ किंवा मेडिकल सर्टिफिकेट आले, तर ३२६ याच्यापैकी काहीतरी कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करतो. तू पैसे तयार ठेव, बाकी मी बघून घेईन. साहेबांशी बोलून मी काहीतरी मॅनेज करतो.