

नगर: लातूर जिल्हा बँकेचे संचालकपद तिसऱ्यांदा भूषविणाऱ्या सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनाच सहकार कायद्यातील नियमांचा भंग केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने संचालक पदावरून बडतर्फ केले आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये जिल्हा बँकेसाठी शेवटच्या क्षणी आपल्या नावाचे ठराव घेऊन ‘रेस’मध्ये आलेले चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर हे राष्ट्रवादीचे चेअरमनपदाचे प्रमुख दावेदार स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे लातूर बँकेचे तिसऱ्यांदा संचालक झाले होते. दोन टर्मपेक्षा अधिक काळ संचालक राहता येणार नाही, या सहकार कायद्यातील नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्यांचे पद रद्द करावे, यासाठी सभासद सतीश जाधव यांनी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला निर्णय घेण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार, रिझर्व्ह बँकेने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनाच संचालक पदावरून दूर करण्याचे आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे विशेषतः अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नगर जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सहकारमंत्री हेच तिसऱ्यांदा संचालक पदावर विराजमान असल्याचे लक्षात घेत, चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर व अंबादास पिसाळ यांनीही तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी शेवटच्या क्षणी स्वतःचे ठराव करून घेतले होते. यात राष्ट्रवादीकडून घुले आणि गायकर चेअरमन पदाचे प्रबळ दावेदार होते. राष्ट्रवादीने चेअरमन पदावर दावाही केला होता.
मात्र भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते, सहकारमंत्री पाटील यांचेच पद रद्द झाल्याने घुले, गायकर यांच्यासह पिसाळ हेही स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता वाढली आहे. असे घडल्यास नगर बँकेचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार असून, राष्ट्रवादीकडे अनुभवी चेहरा नसल्याने भाजपसाठी चेअरमन पदाची ‘रेस’ सोपी झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सहकारमंत्री पाटील हे न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते. यामध्ये जर त्यांच्यासाठी संरक्षण देणारा निर्णय झाला, तरच नगरमध्ये घुले, गायकर व पिसाळ हे पुन्हा ‘रेस’मध्ये दिसतील, अन्यथा त्यांना थांबावे लागणार असल्याचे जाणकार सांगतात.