

नगर: कधी काळी काँग़्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जाणारा अहिल्यानगर जिल्हा हा आता पूर्णपणे भाजपच्या वर्चस्वाखाली आला आहे. आज महायुतीतही भाजपचाच ‘मोठा भाऊ’ असून, येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून अगदी जागावाटपापासून ते अध्यक्षपदाच्या ‘बार्गेनिंग’मध्येही भाजपच पॉवरफूल ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीतून जिल्हा बँक ताब्यात घेण्याची भाजपला संधी निर्माण झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी खरोखर अध्यक्षपदाचा दावा सोडेल का, जागावाटपातही समान फॉर्म्युला ठरणार का, याकडे लक्ष असणार आहे.
सन 1957 मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा बँकेच्या इतिहासात सहकारातील अनेक दिग्गजांनी अध्यक्षपद भूषविले आहे. यात, थोरात, विखे, घुले, गडाख यांसह अनेक प्रमुख घराण्यांचा दबदबा दिसला. 2023 ची (शिवाजी कर्डिले) अध्यक्षपदाची निवडणूक वगळता भाजपला कधीही बँक ताब्यात घेता आलेली नाही. मात्र, जिल्ह्यातील राजकीय बलाबल पाहता येणाऱ्या निवडणुकीत बँक ताब्यात घेण्याची भाजपला संधी असल्याचे चित्र आहे.
अजित पवारांशिवाय निवडणूक
एकेकाळी जिल्हा बँकेच्या सत्तेभोवती राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसत होते. मावळते अध्यक्ष चंद्रशेखर घुले हेदेखील राष्ट्रवादीचे होते. मात्र, येणारी निवडणूक ही स्व. अजित पवार यांच्याशिवाय होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाचा बार्गेनिंग पॉवरही कमी होणार आहे. तर दुसरीकडे पहिल्यांदा प्रवरेत फुललेले कमळ, आता दिवसेंदिवस जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या संस्थांमध्येही फुलताना दिसत आहे, आता बँकेपर्यंत त्याचा ‘राजकीय’ गंध दरळवणार आहे.
‘बार्गेनिंग पॉवर’ संपली?
जिल्ह्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचे समान चार-चार आमदार आहेत. असे असताना, 2025 मध्ये झालेल्या 10 नगरपरिषद, नगरपालिकांच्या सत्तेत 7 ठिकाणी भाजपने आपले नगराध्यक्ष बसवले. त्यानंतर नुकतेच राहुरीतही प्राजक्त तनपुरेंना भाजपात घेत आठ ठिकाणी सत्ता घेतली. महापालिका निवडणुकीत तर राष्ट्रवादीच्या बोटाला धरून भाजप (27-25) थेट सत्तेत पोहचले. त्यामुळे महायुतीत भाजपाने काय कमावले आणि राष्ट्रवादीने काय काय गमावले याचा पुढचा अंक म्हणून जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष आहे. त्यामुळेच आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागणार या भीतीने दक्षिणेतील काही नेते चिंता व्यक्त करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेला राजकीय वाटाघाटीत अजूनही योग्य निशाणा साधता आलेला नाही.
बिनविरोधचा फॉर्म्युला कसा?
येत्या आठवडारभरात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी बिनविरोधचा सूर आळवला जात आहे. 21 जागांचा फॉर्म्युला कसा असेल, याविषयीही चर्चा सुरू आहे. संगमनेर (थोरात) आणि नेवासा (गडाख) वगळता अन्य ठिकाणी महायुतीतच स्पर्धा असेल. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली तरी त्यात महायुतीकडे 17, तर विरोधी मविआकडे जास्तीत जास्त चार जागाच असतील, याविषयी काळजी घेतली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. या 17 मध्येदेखील भाजपा ‘अध्यक्षपद’ नजरेसमोर ठेवून राष्ट्रवादीला तशा ‘जागा’ दाखविणार आहे. राष्ट्रवादीकडून सीताराम गायकर आणि चंद्रशेखर घुले हे दोघे फॉर्म्युल्यावरील चर्चेत सहभागी असतील. त्यात अध्यक्षपदावर दावा ठेवून ते भाजपशी तडजोडीत ‘दोन हात’ कसे करतात, यावरच बँकेच्या सत्तेचे गणित ठरणार आहे. येत्या दोन दिवसांत यावरच पक्षांतर्गत प्राथमिक बैठक असल्याचेही समजते.