पाथर्डी: तीन वर्षापासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाला बुधवारी संघर्षाचे रुप आले. दोन कुुटुंबाने एकमेकांवर हल्ला केला. या वादात हवेत गोळीबार झाल्याने एकच पळापळ झाली. पाथर्डी तालुक्यातील काटेवाडी बुधवारी (दि.7) घडलेल्या या घटनेचा गुन्हा शनिवारी पोलिसांत दाखल झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
नवनाथ नामदेव उगलमुगले (रा. काटेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान श्रीधर रघुनाथ ढाकणे यांच्या घरासमोर रस्त्यावर आंबादास मुरलीधर ढाकणे, रामदास मुरलीधर ढाकणे, अर्जुन गंगाधर ढाकणे, विनय रामदास ढाकणे व योगेश नामदेव ढाकणे (सर्व रा.काटेवाडी, ता.पाथर्डी) यांनी त्यांना व त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर व गणेश यांना अडवून शिवीगाळ व दमदाटी केली.
रामदास मुरलीधर ढाकणे याने लोखंडी पाईपने वार करत नवनाथ उगलमुगले यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. योगेश नामदेव ढाकणे याने ज्ञानेश्वर उगलमुगले याला धरून ठेवत त्याच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार केल्याचा आरोप आहे. तसेच सर्व आरोपींनी गणेश उगलमुगले याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत उगलमुगले कुटुंबाच्या दोन मोटारसायकली फोडून नुकसान करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, रामदास मुरलीधर ढाकणे (रा. काटेवाडी) यांनीही फिर्याद दिली. बुधवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नवनाथ नामदेव उगलमुगले, वैजयंता नवनाथ उगलमुगले, ज्ञानेश्वर नवनाथ उगलमुगले, गणेश नवनाथ उगलमुगले, दादासाहेब मल्हारी उगलमुगले (सर्व रा.काटेवाडी) व सचिन नारायण किर्तने (रा.किर्तनवाडी, ता.पाथर्डी) यांनी त्यांना, भाऊ आंबादास मुरलीधर ढाकणे व मुलगा विजय यांना तलवारीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.
नवनाथ उगलमुगले याने तलवारीने डोक्यावर वार केल्याने रामदास ढाकणे गंभीर जखमी झाले. ज्ञानेश्वर उगलमुगले याने आंबादास ढाकणे यांच्या पोटावर तलवारीने वार केल्याचा आरोप आहे. तसेच नवनाथ उगलमुगले याने गावठी कट्ट्याने हवेत गोळीबार केल्याचा गंभीर दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी स्विफ्ट कारमधून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेतील जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.