पाथर्डी: तालुक्यातील खांडगाव येथे झालेल्या थरारक दरोडा प्रकरणातील 3 फरार आरोपींना पाथर्डी पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे. या आरोपींकडून चौकशीत आणखी 5 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सलमान जमादार पठाण (वय 24, रा. करंजी), ओम बाळासाहेब वांढेकर (वय 19, रा. खांडगाव, ता. पाथर्डी), सोफियान फारुख भालदार (वय 19, रा. शेवगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दि. 31 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 10च्या सुमारास खांडगाव येथे एका ट्रॅव्हल्स वाहनास कार आडवी लावून 5 ते 6 जणांनी दरोडा टाकला होता. आरोपींनी ट्रॅव्हल्समध्ये जबरदस्तीने प्रवेश करून प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी दिली. गावठी पिस्तूल व चाकूसारखी हत्यारे दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटण्यात आली होती.
पाथर्डी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापूर्वी 4 आरोपींना अटक करण्यात आली होती, तर 5 आरोपी फरार होते. तपास सुरू असताना रविवारी (दि. 14) फरार आरोपी करंजी घाटातील दगडवाडी शिवारातील डोंगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पाथर्डी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, मात्र पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत या तिघांनी खांडगाव दरोड्याची कबुली दिली. तसेच पाथर्डी व शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी घडलेल्या एकूण 5 जबरी चोरीच्या गुन्ह्यांतही त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे आरोपी सलमान जमादार पठाण याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, दंगा, मारहाण अशा स्वरूपाचे एकूण 5 गुन्हे जिल्ह्यात दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, नितीन दराडे, बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद, संजय जाधव व स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या पथकाने केली आहे.