पाथर्डी: महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेला सुगंधी तंबाखूमिश्रित मावा तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी शिवारात उघडकीस आला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. १६) लमाणतांडा रस्त्यालगत वाघमोडे वस्तीवरील कोंबड्यांच्या शेडमध्ये छापा टाकून मावा तयार करण्याची विद्युत मशीन, तयार मावा, सुगंधी तंबाखूमिश्रित सुपारीचा चुरा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, दोघे फरार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिस हवालदार अरुण गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिडसांगवी शिवारात प्रतिबंधित सुगंधी मावा तयार केला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.यावेळी नवनाथ भानुदास जगताप यांच्या कोंबड्यांच्या शेडमध्ये शहादेव भानुदास जगताप (वय ५१, रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) हा आढळून आला.
पोलिसांनी शेडची झडती घेतली असता, तेथे सुगंधी तंबाखूमिश्रित मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी विद्युत मशीन, तयार मावा आणि सुपारीचा चुरा मिळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८० हजार रुपये किमतीची मावा तयार करण्याची विद्युत मशीन, ३० हजार रुपये किमतीचा ३० किलो सुगंधी तंबाखूमिश्रित सुपारीचा चुरा, २० हजार रुपये किमतीचा १० किलो तयार मावा आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहादेव जगताप याने हा मावा त्याचा भाऊ नवनाथ जगताप याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी तयार करत असल्याचे सांगितले. तसेच मावा तयार करण्यासाठी लागणारा सुगंधी तंबाखू, सुपारीचा चुरा आणि इतर साहित्य शिरूर कासार (जि. बीड) येथील मिलन ललवाणी याच्याकडून मिळाल्याचे सांगितले.
या प्रकरणात शहादेव भानुदास जगताप, नवनाथ भानुदास जगताप आणि मिलन ललवाणीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत शहादेव जगताप याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. नवनाथ जगताप आणि मिलन ललवाणी हे फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलिस करीत आहेत. कॉन्स्टेबल आजीनाथ महादेव पाखरे यांनी फिर्याद दिली आहे.