पाथर्डी: शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी पाथर्डी नगरपरिषदेने शहरातील सर्व वाहन धुलाई केंद् बंद ठेवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वॉशिंग सेंटर संघटनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.
पाथर्डी नगरपरिषदेने पाणीपुरवठा विभागामार्फत संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार शहरातील सर्व वॉशिंग सेंटर चालकांनी बोअरपंपस तसेच पिण्याच्या पाण्याचा किंवा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यातून मिळणाऱ्या पाण्याचा वाहन धुलाईसाठी वापर करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. सरसकट वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून आवश्यक निर्बंधांसह व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वॉशिंग सेंटर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोरुडे यांनी तहसीलदारांकडे केली.