

शशिकांत पवार
नगर तालुका: नगर तालुक्यातील पशुपालक चारा- पाण्याच्या समस्येमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सुमारे अडीच लाख पशुधनासाठी उपलब्ध चारा जेमतेम महिनाभर पुरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संभाव्य संकटाची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार पशुसंवर्धन विभागाने गावोगावी पशुपालकांचे सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू केले आहे. सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. संकटात पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधन विभागाने कंबर कसली असून, अधिकारी व कर्मचारी अलर्ट मोडवर काम करत आहेत.
नगर शहर व तालुक्यातील १९ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या १४ ऑक्टोबरपर्यंत ८ हजार ८४८ पशुपालकांची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. सर्वेक्षणात केवळ पशुपालकांची नोंद न करता भविष्यातील चारा व पाणीटंचाईचा अचूक अंदाज घेण्यासाठी विविध बाबींची माहिती संकलित केली जात आहे.
गाय, म्हैस, शेळ्या व इतर पशुधनाची संख्या, दुभती व भाकड जनावरे, वयाप्रमाणे पशुधनाची संख्या, दैनंदिन दूध उत्पादन, स्थलांतरित जनावरे, चाऱ्याची उपलब्धता आणि पाण्याची परिस्थिती यांची नोंद घेतली जात आहे.तसेच हिरवा चारा, मुरघास, वाळलेला चारा, विक्रीसाठी उपलब्ध चारा, रब्बी हंगामात चारा लागवडीयोग्य क्षेत्र आणि सिंचनाच्या सुविधांचाही आढावा घेतला जात आहे. या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकरी गट, बचत गट, फार्मर प्रोड्यूसर कंपन्या, तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांना उपलब्ध सिंचन सुविधेनुसार चारा पिकांच्या बियाण्यांचे वाटप करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर गावनिहाय चारा व पाणी उपलब्धतेचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना आखण्यात येणार आहेत.
पाझर तलाव, गायरान क्षेत्रे आणि पाण्याच्या उपलब्धतेचे सर्वेक्षणही पशुसंवर्धन विभागाकडून केले जात आहे. चारा उत्पादन वाढविण्यासाठी उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग कसा करता येईल, यावर भर दिला जात आहे. या कामाला गती देण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी तहसीलदारांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, मैत्री कर्मचारी आणि पशुशाखेतील संबंधित कर्मचारी यांचीही मदत घेतली जाणार आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून प्रत्येक गावातील पशुपालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दुष्काळात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असताना पशुसंवर्धन विभागाने प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन पशुपालकांची माहिती संकलित करण्यास प्राधान्य दिले आहे. चारा उत्पादन, बियाणे वाटप, पाणी उपलब्धता आणि पशुधन संवर्धनाच्या उपाययोजनांसाठी पायाभूत माहिती तयार केली जात आहे.
सुमारे अडीच लाख पशुधन असलेल्या तालुक्यात चारा जेमतेम महिनाभर पुरण्याची शक्यता लक्षात घेता पुढील आठ ते दहा महिने पशुपालकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतात. अशा परिस्थितीत पशुसंवर्धन विभागाने सर्वेक्षणाला दिलेली गती आणि विविध शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन नियोजन करण्याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ठोस उपाययोजना वेळेत राबविल्यास पशुपालकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
जिल्ह्यातील पशुपालकांच्या नोंदी !
(बुधवार दि. १४ पर्यंत ) अकोले ७३५४, जामखेड ३७४७, कर्जत ६८८३, कोपरगाव ९६१५, नगर ८८४८, नेवासा ६१५५, पारनेर३९९९, पाथर्डी ११,४८८, राहता ६३१३, राहुरी ५९२९, शेवगाव १३, ६१२, श्रीगोंदा ६९४७, संगमनेर ८०१५, श्रीरामपूर ५७३१,एकूण १०४६३६
तालुक्यातील पशुपालकांच्या नोंदी घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पशुपालकांनी कोणाची नोंद घेण्याचे राहिले असल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधावा.
डॉ मुकुंद राजळे, सहायक आयुक्त, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी