नगर: नववर्षाचे स्वागत म्हणजेच 31 डिसेंबरच्या सण-उत्सवाच्या काळात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कडक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, मद्यशौकीनांना नियमांचे पालन करून आनंद साजरा करता यावा, यासाठी एक दिवसाचा दारू पिण्याचा (वन-डे ड्रिंकिंग) परवाना दिला जात आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असेे 1 लाख 20 हजार परवाने देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात दि.25 डिसेंबर नाताळापासूनच नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. आता 31 डिसेंबर व 1 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर नगरकर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. कायद्याचे उल्लंघन न करता, शांततेत व आनंदात उत्सव साजरा व्हावा यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी कडेकोट नियोजन केले आहे.
आठ विशेष पथकांचा वॉच
जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती व विक्री, भेसळयुक्त ताडी व हातभट्टी दारू, हॉटेल व ढाब्यांवर परराज्यातील मद्य विक्री, अवैध स्पिरीट वाहतूक, लपून-छपून मद्य वाहतूक व वितरण यावर प्रतिबंध घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचारी मिळून आठ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
विनापरवाना पार्टी केली तर थेट जेल
दि.31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मद्य पार्टीचे आयोजन केले जाते. वन-डे परवान्याशिवाय मद्यवितरण सुरू असल्यास संबंधित ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रिसॉर्ट, हॉटेल, बँक्वेट हॉल या सर्व ठिकाणी अधिकृत परवाना घेतल्याशिवाय कार्यक्रम घेता येणार नाही. वन-डे परवाना तसेच लाईफटाईम पास अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन मिळवता येतील, असेही सांगण्यात आले.
देशीचे 55, विदेशीचे 65 हजार पास
उत्पादन शुल्क विभागाकडून देशी दारू पिणाऱ्यांसाठी दोन रुपयांमध्ये हा पास दिला जाणार आहे. तर ‘विदेशी’ची आवड असलेल्या मद्यपींना एक दिवस दारू पिण्यासाठी पाच रुपयांचा पास आवश्यक असणार आहे. देशीचे 45 हजार आणि विदेशीचे 65 हजार पास विकले जाणार आहेत्त. ज्यांच्याकडे पास आहे, त्यांना त्या दिवशीही तरी दारू पिणे कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित आहे.
वर्षभरात 264 कारवाया
उत्त्पादन शुल्क विभागाने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत 264 छापे टाकले असून, यात 251 जणांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 1 कोटी 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच डिसेंबर 2025 या एकाच महिन्यात सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात 2267 लिटर दारूचा समावेश आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना हॉटेल, ढाबे, यासह संबंधित कुठेही कायद्याचे उल्लंघन झाल्याचे खपवून घेणार नाही. आठ पथके गस्त घालणार आहेत. वेळेचे आणि नियमावलीचे भान ठेवा.प्रमोद सोनोने, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग