नेवासा: तालुक्यातील गोधेगाव, भालगाव परिसरात गेल्या दोन दिवसांत बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन दिले. तसेच प्राण्यांवर हल्ला केल्याने शहराजवळील ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
नेवासा शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोधेगावातील जुन्या जामगाव रस्त्यावर मंगळवारी रात्री 8.30 वाजता रामेश्वर गाडेकर (वय 23) हा आपल्या वस्तीवरील घराकडे चालला असताना शेलार वस्तीजवळ बसलेला बिबट्या त्याला दिसला. गाडेकर यांनी तत्काळ आपल्याजवळील टॉर्चचा प्रकाश बिबट्याच्या डोळ्यावर टाकत हळूहळू मागे सरकत सुरक्षितपणे घर गाठले. काही वेळानंतर परत पाहणी केले असता, त्याठिकाणी बिबट्याने एका डुकरावर हल्ला करून ठार केले होते.
याच रात्री नेवासा-उस्थळ रस्त्यावर मोहनराव कुटे यांच्या वस्तीवरही रात्री बाराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. बिबट्या आल्याचे समजताच मोहन कुटे यांच्यावडील भास्करराव कुटे यांनी फटाके आणि तोफा वाजविल्यानंतर बिबट्या पळून गेला. गोधेगाव परिसरात सुमारे महिन्यापूर्वीही हल्ला केला होता. गेल्या काही दिवसांपासून गंगथडी भागातील भालगाव परिसरात काही दिवसांपासून बिबट्या असून, या चार दिवसांत या बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावावा, अशी मागणी सातत्याने केली जाते. मात्र, वनविभागाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
सध्या कांदा व ऊसलागवडीची कामे सुरू असल्याने बिबट्याच्या भीतीने शेतमजूर शेती कामासाठी येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. भटके कुत्र्याचा पूर्णपणे नायनाट केल्याचे दिसते. या परिसरात हरणे व रानडुकरांचा सुळसुळाट झाल्याने देखील बिबट्याचा वावर वाढल्याचे शेतकरी सांगतात. गहू पेरणी, कांदा लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने मजूर मिळत नाही, मिळाले तर बिबट्याच्या भीतीने ते कामासाठी येत नाही. शेतकऱ्यांनी या बिबट्याची धास्ती घेतली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अद्याप जाग येत नसल्याने जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
वन विभागाला बिबट्याच्या हल्ल्याची प्रतीक्षा
भालगाव परिसरात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी भयभित झाले असतांना वन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करीत असतांना वन अधिकारी अजून काही घटना झाली का? असा उलट प्रश्न उपस्थित करीत आहेत. वनविभाग आता बिबट्याने कोणाला तरी खाण्याची वाट बघत असल्याचे आदिनाथ पटारे या शेतकऱ्याने सांगितले.