

अकोले: तालुक्यात बालविवाहांबाबत गांभीर्याने विचार करण्यात येऊन प्रभावी मोहीम आखली जाईल, अशी शक्यता होती. परंतु तालुक्यात या उलट स्थिती असून तालुक्यातील देवठाण व पिंपळगावखांड येथे झालेल्या अल्पवयीन मुलींच्या बालविवाह प्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे बालविवाहाचे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान गत वर्षात एकही बालविवाह रोखण्यात महिला बालविकास विभागाला यश आलेले नाही.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पिंपळगावखांड, कातरमाळ येथे अल्पवयीन मुलीच्या विवाह बाब बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा पिंपळगावखांड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विनायक कर्डक यांनी फिर्याद दिली. जुन्नर परिसरातील अल्पवयीन मुलगी ही 15 वर्षे 8 महिने वयाची असून मुलगा हा 17 वर्षे 10 महिने वयाचा असून तो पिंपळगावखांड परिसरातील होता.
दुसऱ्या घटनेत, अकोले तालुक्यातील देवठाण परिसरातील 17 वर्षे 2 महिने वयाची अल्पवयीन मुलगी हिचा तालुक्यातील कळस खुर्द येथील अल्पवयीन मुलाबरोबर बालविवाह झाल्याची तक्रार एस. सी.भनगडे यांनी दिली. यावरून अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही तपास अकोले पोलिस करत आहेत.
दरम्यान, दुसरीकडे बालविवाह रोखण्याची जबाबदारी असलेल्या बालविकास विभागाला या विषयाचा विसर पडल्याचे चित्र आहे. गत वर्षेभरात एकही कारवाई झालेली नसल्याने विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर अकोले तालुक्यातील ग्रामीण भागात बालविवाहाच्या घटना यंदाही घडल्या आहेत. स्थलांतरित झालेल्या मजूरांच्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण राबवण्याची आवश्यकता होती. परंतु जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नसल्याने बालविवाहाची समस्या कायम आहे.
अकोले तालुक्यात जर कुठे बालविवाह होत असेल तर अकोले पोलिसांना कळवा. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.अकोले तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, संघटना प्रयत्न करीत असून आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे.
पो.नि.मोहन बोरसे
संपूर्ण भारतात दरवर्षी बालविवाहाचे फक्त एक हजार गुन्हे दाखल होतात. त्या तुलनेत अकोल्यात एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल होणे ही गंभीर गोष्ट आहे. प्रबोधनाने जागृती होते पण, असे गुन्हे दाखल होण्यामध्ये लोकांना त्या विषयाचे गांभीर्य कळते. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक बालविवाहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. देवठाण येथील विवाहात राजकीय कार्यकर्तेही उपस्थित होते. तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांनी इथून पुढे लग्नाला जाण्यापूर्वी त्या लग्नातील मुलीचे मुलाचे वय याची माहिती घेतली पाहिजे.
हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते