संगमनेर: सध्या थंडीचे दिवस असल्याने शिकारीसाठी रात्रीच्या वेळी बिबटे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढल आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर येथील बिबट्या विहिरीत पडल्याची घटना शुक्रवार (दि. 12) रोजी उघडकीस आली. वन विभागाने विहिरीत सोडलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अलगद अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वनविभागाने दिलेली माहिती अशी, मनाजी सुपेकर यांचे नांदुर परीसरात शेती व विहीर आहे. शुक्रवारी रात्री शिकारीच्या शोधासाठी बिबट्या फिरत असताना अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला. सकाळी दिनेश सुपेकर यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे आढळून आले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनविभागाचे पथक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.
वनपाल हारुण सय्यद, वनरक्षक किसन सातपुते, उमा केंद्रे, तुकाराम गुंबांडे वनसेवक दिपक वायळ,विलास दुधवडे, अनंता काळे, बाळासाहेब वैराळ, अजिंक्य तळपे, आदिंनी धाव घेतली. विहिरीत बिबट्या आढळून आल्यानंतर वनविभागाने त्याला पकडण्यासाठी पिंजरा सोडला.
यामुळे रात्रभर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगत पिंजऱ्यात उडी मारली. सावज पिंजऱ्यात अडकतात वनविभागाने पिंजरा वर काढला. या बिबट्याला रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. बिबट्याला पाहण्यासाठी परीसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
परीसरात बिबट्यांची संख्या वाढली असून वन विभागाने हे बिबट जेरबंद करावे. यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे देखील जिकीरीचे झाले आहे.सध्या तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे.