

नगर: मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून व त्या अनुषंगाने होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नायलॉन व चायनीज मांजाच्या खरेदी - विक्रीसह, साठवणूक व वापरावर 12 डिसेंबरपासून 17 जानेवारी 2026 पर्यंत संपूर्ण बंदी घालण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सुमोटो याचिका क्र. 08/2020 मध्ये नायलॉन मांजामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी अशा मांजावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. याच निर्देशांचे पालन करत आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या प्रस्तावानुसार अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (1) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
मकर संक्रांतीच्या काळात जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात, मात्र, काही व्यापारी नायलॉन व चायनीज धाग्याची विक्री करतात. हा मांजा अत्यंत धारदार असल्याने पतंग उडविणाऱ्यांच्या हाताला इजा होण्याची तसेच तुटलेला मांजा रस्त्यावर पडल्यास दुचाकीस्वार, पादचारी आणि लहान मुले अडकून गंभीर जखमी होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय, हा मांजा विद्युत वाहिन्यांवर पडल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या घटनाही घडतात.
विशेषतः पशू-पक्ष्यांच्या जीविताला या मांजामुळे मोठा धोका निर्माण होऊन पर्यावरणाची हानी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 12 डिसेंबर ते 17 जानेवारी या कालावधीसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 5 अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही अपर जिल्हादंडाधिकारी गिते यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
औद्योगिक वापरातील मांजासही बंदी
नायलॉन मांजा अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात नायलॉन व चायनीज मांजाची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, औद्योगिक वापरासाठी असलेला नायलॉन मांजा पतंग उडविण्यासाठी जवळ बाळगणे किंवा वापरणे यावरही बंदी असेल, असे आदेशात नमूद केले आहे.