

संदीप रोडे
नगर: अहिल्यानगरचे वैभव आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या माळीवाडा वेशीच्या मुळावर तेथील सार्वजनिक मंडळेच उठली आहेत, हे आज स्पष्ट झाले. महापुरुषांचे पुतळे उभारणी आणि सुशोभीकरण व सौंदर्यीकरणाचा मुद्दा पुढे करत ही वेस जुनाट झाल्याचा दावा या मंडळांनी केला आहे. एकाच पद्धतीचा मजकूर असलेली या मंडळांची पत्रेच ‘पुढारी’च्या हाती लागली आहेत. आता समस्त नगरकरांनी वेस पाडण्याला विरोध दर्शविल्याने महापालिका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
माळीवाडा वेस काढण्याबाबतची पत्रे माळीवाडा भागातील चार मंडळांनी महापालिकेला पाठविली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व पत्रे एका आठवड्यात तयार होऊन महापालिकेत 6 नोव्हेंबर 2025 या एकाच दिवशी दाखल झाली आहेत. ही पत्रे प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने माळीवाडा वेस जमीनदोस्त करण्याबाबतचा प्रस्ताव लगोलग तयारही केला आणि स्थानिक सायंकालीन वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही प्रसिद्ध केली. त्यातील आशयानुसार माळीवाडा वेस पाडण्याबाबत कोणाच्या काही हरकती, आक्षेप असतील, तर 17 डिसेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविल्या आहेत.
या प्रस्तावाने शहरात खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाविरोधात विविध स्तरातील नागरिक आणि इतिहासप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. माळीवाडा वेस वाचवण्यासाठी नागरिकांची एकजूट वाढत आहे...
माळीवाडा वेस पाडण्याच्या हालचालींना खासदार नीलेश लंके यांनीही जोरदार विरोध दर्शविला आहे. महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या सविस्तर निवेदनात त्यांनी राज्यघटनेतील कलम 49 चा थेट दाखला देत वेशीचे संरक्षण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याची राज्याची सक्त जबाबदारी अधोरेखित केली आहे. माळीवाडा वेस पाडणे हा निर्णय अविवेकीच नव्हे तर संविधानिकदृष्ट्याही चुकीचा ठरेल. राज्यघटनेने संरक्षित मानलेल्या वारशावर कुणालाही हात टाकण्याचा अधिकार नाही असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 49 नुसार, राज्याने प्रत्येक ऐतिहासिक व कलात्मक महत्त्वाच्या वास्तूचे संरक्षण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेने वेस पाडण्याचा विचार करणेच संविधानभंगासमान असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले आहे. खासदारांनी महापालिकेला विकासासाठी रचनात्मक पर्यायही सुचविले आहेत. त्यात वेस कायम ठेवून रस्त्याची पुनर्रचना, वाहतूक वळविण्याचे नियोजन, परिसराला ‘हेरिटेज कॉरिडॉर’ घोषित करणे, तसेच सुशोभीकरण, प्रकाशयोजना, सुरक्षा भिंत, आठवडी बाजार आणि हेरिटेज वॉक माहिती केंद्र यांचा समावेश आहे.
खा. लंके यांच्या मागण्या...
माळीवाडा वेस पाडण्याचा किंवा हलविण्याचा कोणताही प्रस्ताव तत्काळ स्थगित करावा.
वेशीला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून अधिकृत संरक्षण द्यावे.
महापालिकेने वेशीचे संवर्धन, दुरुस्ती व सुशोभीकरण तत्काळ हाती घ्यावे.
पुरातत्व विभाग, इतिहासतज्ज्ञ व हेरिटेज विशेषज्ञांची तज्ज्ञ समिती नियुक्त करावी.
स्थानिक नागरिक, तज्ज्ञ व प्रशासन यांच्यात पारदर्शक चर्चा आयोजित करावी.
कायद्याचाच भंग
खासदार लंके यांनी निदर्शनास आणले की कलम 49 मध्ये संरक्षित हा शब्द स्पष्ट आहे. त्यामुळे संरक्षण करणे हेच शासनाचे कर्तव्य असून ‘उद्ध्वस्त’ हा शब्द राज्याच्या अधिकारातच बसत नाही. त्यामुळे महापालिका व राज्य सरकार या दोघांनीही वेस पाडण्याचा निर्णय घेणे हा कायद्याचा भंग ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.
नगरची ओळख जपा
खा. लंके यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत म्हटले की, माळीवाडा वेस जपणे हे आपण सर्वांचे कर्तव्य आहे. हे नगरच्या शेकडो वर्षांच्या ओळखीचे प्रतीक आहे. वारसा वाचवा म्हणजे पुढील पिढीसाठी इतिहास सुरक्षित ठेवा.