नगर : भातोडी ता. अहिल्यानगर शिवारातील ढबुली वस्तीवर भरदिवसा घरफोडी करून चोरांनी सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा 95 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मोतीराम दशरथ शिंदे (रा. ढबुली वस्ती, भातोडी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान शिंदे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील 60 हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 35 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 95 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला, असे फिर्यादीत म्हटले आहे. नगर तालुका पोलीस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
नगर : तालुक्यातील कौडगाव येथे भरदिवसा घरफोडी करून चोरांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह 80 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत गोपीनाथ शिवाजी शिंगाडे (रा. कौडगाव, ता. जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी बुधवारी सकाळी घराबाहेर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले 80 हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे झुबे आणि वेल चोरून नेले. फिर्यादी घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
नगर : शहरातील गजबजलेल्या माळीवाडा बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी पुन्हा एकदा हातसाफ केला आहे. बसमध्ये बसण्याच्या गडबडीत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत जनाबाई एकनाथ ढापसे (रा. अर्धाम्हसला, ता. गेवराई, जि. बीड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी महिला गावी जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संदीप पितळे करीत आहेत.