Fraud Pudhari
अहिल्यानगर

Multistate Deposit Fraud: भगवानबाबा मल्टीस्टेटमध्ये 5.63 कोटी अडकले! श्रीरामपूर शाखेवर फसवणुकीचा गुन्हा

49 ठेवीदारांची रक्कम न परतवल्याचा गंभीर आरोप; संचालक मंडळाविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नगर/श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी एक मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत आली आहे. भगवानबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत 49 ठेवीदारांच्या 5 कोटी 63 लाख 49 हजार 764 रुपयांच्या ठेवी अडकल्या असून या ठेवींची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने संस्थेच्या संचालक मंडळावर 26 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत ठेवीदार सौ.निकिता सचिन पवार (रा.केसापूर, ता.राहुरी) यांनी फिर्याद दिली. भगवानबाबा मल्टिस्टेटच्या नगर शहरासह शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी, बोधेगाव येथे शाखा आहेत.

श्रीरामपूर शाखेत फिर्यादी निकिता पवार यांच्या पतीच्या नावे सन 2023 मध्ये 2 कोटी 99 लाख 55 हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. या ठेवींची मुदत संपल्यावर आणि फिर्यादी यांच्या कुटुंबीयांना पैशांची आवश्यकता असल्याने त्या संस्थेत ठेवी आणि त्यावरील व्याजाची रक्कम मागण्यासाठी गेल्या असता ठेवी परत करण्यास टाळाटाळ सुरू करण्यात आली.

पवार यांनी संस्थेच्या चेअरमनसह संचालक मंडळाशी अनेक वेळा संपर्क साधून ठेवीच्या रकमेची मागणी केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. संस्थेकडून ठेवीची रक्कम तसेच व्याज मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता या शाखेत अजून इतर 48 ठेवीदारांच्या 2 कोटी 63 लाख 94 हजार 764 रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत.

अशा फिर्यादीसह 49 ठेवीदारांच्या 5 कोटी 63 लाख 49 हजार 764 रुपयांच्या ठेवी देण्यास संचालक मंडळाने टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी ठेवीदारांचे अर्ज, ठेवीच्या पावत्या व इतर कागदपत्रांची चौकशी केल्यावर सौ.निकिता पवार यांची फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, संचालक मयूर रंगनाथ वैद्य, नितीन सोपानराव तुपे, शांतीसिंग नागनाथ साखरे, राम लक्ष्मण पोपळघट, किशोर अनिल सुरवसे, वैशाली मयूर सुरवसे, व्यवस्थापक प्रवीण म्हसे या 8 जणांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT