

नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार असून, त्या दृष्टीने बँकेचा सेवक हा प्रशिक्षित होणे गरजेचे असल्याने जिल्हा बँकेने सेवकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
बॅंकेचे सोने तारण कर्जावरील व्याजदर इतर बॅकांच्या तुलनेत कमी असून आता सेवकांनी टार्गेट ओरिएंट काम करण्याच्या दृष्टीने कामकाज करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.
बँकेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सभागृहामध्ये बँकेचे जिल्ह्यातील शाखांतील सेवकांकरीता सोने तपासणी व त्या संदर्भात आणि अडचणी संदर्भातील प्रशिक्षण वर्गप्रसंगी ते बोलत होते. घुले पाटील म्हणाले, जिल्हा बँकेला मोठा इतिहास असून बँकेची परंपरा अतिशय उज्ज्वल आहे. बँकेने नेहमीच शेतकरी, ग्राहकांच्या आणि सभासदांच्या हिताचे दृष्टीने कामकाज केले आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी या प्रशिक्षण वर्गाचे महत्त्व विशद करून बँकेचे सेवक निश्चित प्रमाणे सोने तारण व्यवसाय वाढवतील, अशी ग्वाही वर्पे यांनी दिली.याप्रसंगी जिल्ह्यातील तालुका विकास अधिकारी व सेवकांच्या वतीने बँकेच्या अध्यक्ष पदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर जयंत देशमुख, राजेंद्र शेळके, सुरेश पाटील, संजय बर्डे, मॅनेजर व सेवकवृंद हजर होते.