

श्रीगोंदा : घोड नदीपात्रात वाळू तस्करांनी बेकायदा बोटीच्या साह्याने वाळू उपसा चालविला होता. दररोज लाखो रुपयाची वाळू चोरून नेली जात होती. श्रीगोंदा व शिरुर तालुक्यांतील महसूल पथकाने वडगाव शिंदोडी व माठ परिसरातील घोड नदीपात्रात वाळू तस्करांच्या बोटी जिलेटीनचा स्फोट करून सव्वा कोटी किमतीच्या सहा फायबर बोटी व सात सेक्शन पंप उद्ध्वस्त करुन टाकले.
महसूल पथकाच्या कारवाईने वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, वाळूतस्कर डोईजड आहेत. राजकिय आश्रयाच्या नावाखाली महसूल कर्मचाऱ्यांना नदीत उतरू देत नव्हते. अहिल्यानगर व पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या वाळूतस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी संयुक्त मोहीम एकाच दिवशी एकाच वेळी राबविण्याच्या सूचना श्रीगोंद्याचे तहसीलदार सचिन डोंगरे शिरूरचे तहसीलदार म्हस्के यांना दिल्या.
दोन्ही तहसीलदारांना आपली यंत्रणा अलर्ट केली. वाळूतस्करांना थांगपत्ता लागू न देता मंगळवारी दिवसभर बोटी फोडण्याचा कार्यक्रम केला .जिलेटीनचा आवाज, आग धूर सरकारी गाड्यांची वाजणारी सायरन यामुळे नदी पात्राला युद्ध भूमीचे स्वरुप आले होते.
परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने जमले होते मस्तावलेल्या वाळू तस्करांवर कारवाई केली याचे स्वागत केले आहे. या मोहीमेत मंडल अधिकारी राजेंद्र ढगे, महेश धुमाळ, कामगार तलाठी प्रतीक धनवटे राजेंद्र भुतकर, महेंद्र शिंदे, विनोद जाधव, राजीव सोळंके , बाबासाहेब भवर ,प्रशांत गोंडचर सहभागी झाले होते.
वाळूतस्करांना सत्ताधारी राजकीय लोकांचा वरदहस्त आहे. त्यामध्ये शिरुर तालुक्यातील वाळूतस्करींची संख्या मोठी आहे. त्यांची मुजोरी वाढली असल्याचे दिसते.
श्रीगोंदा व शिरूर महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे. या बोटी सेक्शन पंप कुणाचे याची माहिती जमा करुन संबधीत बोट मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
सचिन डोंगरे, तहसीलदार, श्रीगोंदा