Mandave Solar Project Tree Cutting Pudhari
अहिल्यानगर

Mandave Solar Project Tree Cutting: मांडवेतील सौरऊर्जा प्रकल्पाचा वाद विकोपाला! बेकायदा वृक्षतोडीच्या तक्रारीनंतर वन विभागाकडून जागेचा पंचनामा

४५ एकर संपादित जागेतील झाडे गेली कुठे? असा ग्रामस्थांचा संतप्त सवाल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करत अरेरावीचा आरोप.

पुढारी वृत्तसेवा

करंजी : पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संबंधित कंपनीकडून प्रकल्प उभारणीसाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे.

वृक्षतोडी विरोधात कविता गावंडे यांनी वन विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर सोमवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदा,र तसेच सरपंच, संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व दोन पंचासह या सोलर प्रकल्पाच्या जागेची पाहणी करून पंचनामा केला.

मांडवे गावात एका कंपनीच्या माध्यमातून सौरऊर्जा सोलर प्रकल्प उभारला जात आहे. त्यासाठीसहा-सात शेतकऱ्यांची सुमारे 45 एकर जमीन घेतली आहे. या जमिनीतील अनेक लहान-मोठे वृक्ष वनविभागाची परवानगी न घेताच तोडण्यात आल्याची तक्रार सविता आप्पासाहेब गावंडे यांनी वन विभागाकडे केली आहे. तसेच कंपनीद्वारे टाकण्यात आलेली विजेची एक्स्प्रेस लाईन देखील मांडवे तिसगाव रस्त्याला चिटकून खांब उभे करून केली जात असल्याची तक्रार गावंडे यांनी केली आहे.

त्यामुळे या प्रकल्पा विरोधातील वाद आणखीनच वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. गावचे सरपंच राजेंद्र लवांडे, तक्रारदार कविता गावंडे, रामदास जाधव यांच्यासह वनपाल अशोक शर्माळे, वनरक्षक मनीषा शिरसाट, तसेच कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत या ठिकाणाची स्थळ पाहणी करीत पंचनामा करण्यात आला आहे.

एकंदरीत मांडवे येथील एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर येथील सौरऊर्जा प्रकल्प चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यासर्व प्रकाराबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांची देखील भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.

प्रकल्पाच्या जागेतील झाडे गायब

सौरऊर्जा प्रकल्पाच्या आजूबाजूच्या सर्व जमीन क्षेत्रांमध्ये अनेक मोठमोठी झाडे आहेत. मग प्रकल्पासाठी कंपनीने ताब्यात घेतलेल्या 45 एकरामध्ये एकही झाड नव्हते का? असा प्रश्न उपस्थित करीत या 45 एकरातील झाडे गेली कुठं? मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली कंपनीचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थांना अरेरावी करीत असल्याचा आरोप सरपंच राजेंद्र लवांडे, तक्रारदार कविता गावंडे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT