Kanifnath Pudhari
अहिल्यानगर

Madhi Kanifnath Devsthan controversy: मढी कानिफनाथ देवस्थान वादावर संजय मरकड यांचे स्पष्टीकरण

गाळे करार, अतिक्रमण व देवस्थान कारभारावर पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: कानिफनाथ देवस्थानचा कारभार गेल्या अडीच वर्षांपासून पाहिलेला नाही. तसेच संबंधित गाळ्यांच्या करारनाम्यावर सरचिटणीसांची सही नसल्याने बिगर सहीचे करारनामे बेकायदा असे स्पष्टीकरण श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानचे माजी अध्यक्ष संजय मरकड यांनी पत्रकार परिषदेत दिले.

मरकड म्हणाले, देवस्थानातील गाळे मुस्लिमांना भाड्याने देण्याचा करार त्यांच्या कार्यकाळात झाल्याचा विश्वस्त मंडळाने आरोप केला. तो खोडून काढताना हा करार माझ्या संमतीशिवाय झाला असून, गेल्या अडीच वर्षांच्या काळात प्रोसीडिंग बुकवर एकही सही केली नाही. ज्या जागा देण्यात आल्या, त्या जागांचे करार रखडले आहेत, त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. असे मरकड म्हणाले.

मरकड म्हणाले की, मढी येथे पर्यटन योजनेतून साडेचार कोटी रुपयांच्या काँक्रीट रस्त्याचे काम मागील देवस्थान ट्रस्टमधील सरचिटणीसांच्या मुलाने केले. रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन करण्यात आले असून, त्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. ज्यांनी मुरूम उचलला त्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मढी येथील गट क्रमांक 714 मधील 5.37 हेक्टर जमीन ‌‘मायंबा देव‌’ या नावाने नोंद असून त्या जागेवर वक्फ बोर्डाचा दावा सांगितला जात आहे. वक्फ बोर्डाशी वाद सोडविण्याऐवजी गोमातेच्या गोशाळेवर अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात असल्याची टीका त्यांनी केली. संबंधित जागा देवस्थानची नसल्याचा दावा करत, मुस्लिमांच्या ताब्यातील सुमारे 80 एकर, हिंदूंच्या ताब्यातील तसेच गोशाळेच्या 14 एकर अतिक्रमणाबाबत समान कारवाई करावी, असे आव्हान त्यांनी दिले. सर्व अतिक्रमणे काढायची असतील तर मी बुलडोझर लावण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

गोशाळेच्या मु्‌‍द्यावरून माझी विनाकारण बदनामी केली जात असल्याचा आरोप करीत त्यांनी सांगितले की, 2018 पासून त्या संस्थेच्या विश्वस्तपदावर मी नाही. तरीही गोशाळेच्या नावाने राजकारण केले जात आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. देवस्थानच्या सध्याच्या सचिवांचा मुक्काम कुठे आहे, त्यांचा बंगला देवस्थानच्या जागेवरच आहे का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी मरकड यांनी केली. देवस्थानच्या कारभारात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. मढी देवस्थान शांत ठेवण्याऐवजी चुकीची माहिती देऊन वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यांचा कार्यकाळ संपला असून त्यांना हटवून येथे नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी नेमावा असे त्यांनी सांगितले.

किर्तन-भजन बंद केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. मी हिंदू धर्माचा असून कीर्तन-भजनाला विरोध करणे शक्य नाही. कोविड काळात मंदिर बंद असल्याने कार्यक्रम थांबले होते. एकच कीर्तनकार त्यांनाच पाकीट द्यायचे. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ग्रामपंचायत ही देवस्थानकडून सुद्धा कर वसूल करते. कर वसुली करणे हे प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे काम आहे सरपंच वसुली करत नाही. कर वसूल करणे हा ग्रामपंचायतीचा अधिकार आहे. मात्र जास्त कर घेतला असल्यास चौकशी व्हावी.

मढी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यामुळे ग्रामपंचायतीला शासनाकडून सुमारे 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. परंतु नंतर झाडांची तोड रस्ते रुंदी करण्याच्या नावाखाली करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी भानुदास मरकड, भाऊसाहेब निमसे, शरद कुटे आदी उपस्थित होते.

मुस्लिमांचे मला मतदान नको

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुस्लिमांनी मला किंवा माझ्या कुटुंबातील उमेदवाराला मतदान करू नये. यदाकदाचित मी पुन्हा सरपंच झालो, तर मुस्लिम समाजाला कोणत्याही सुविधा देणार नाही, असे वक्तव्य सरपंच संजय मरकड यांनी करून आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT