Ahilyanagar Leopard Attack Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Leopard Attack: एक पिंजऱ्यात, दुसरा विहिरीत! दोन बिबट्यांमुळे खारेकर्जुनेत संतापाचा उद्रेक

नरभक्षक कोणता याबाबत संभ्रम; ग्रामस्थांचा वनविभागावर अविश्वास – ठोस कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका : खारेकजुने, निंबळक परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षका बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, एक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला, तर आणखी एक बिबट्या याच परिसरात विहिरीत पडल्याचे सोमवारी (दि.17) समोर आले. यातील नरभक्षक बिबट्या कोणता याबाबत संभ्रमावस्था आहे.

खारेकर्जुने येथे आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाने पकडल्याचा दावा केला. मात्र, वनविभागाच्या कार्यवाहीवर संशय व्यक्त करीत ग्रामस्थांनी हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले. त्यातच आज दुसरा बिबट्या विहिरीत आढळून आला. विहिरीत पडलेल्या नरभक्षक बिबट्याला ठारा मारा, अन्यथा आम्ही फाशी घेऊ, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान, महिलांनीही बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास विरोध केला. मात्र, सायंकाळी विहीरीतील बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. गेल्या 24 तासात खारेकर्जुने परिसरात दोन बिबटे जेरबंद करून रेस्क्यू करण्यात यश आले. मात्र, ग्रामस्थांमधील भीती अजून संपलेली नाही.

खारेकर्जुने येथे तीन दिवसांपुर्वी पाच वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला जीवे मारले. निंबळक येथेही आठ वर्षाच्या मुलाला जखमी केले. तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ले केले. आठ दिवसांपासून परीसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जीवे मारण्यासाठी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. तसेच गाव बंद ठेवण्यात आलेे. त्यामुळे खारेकर्जुने परिसरातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश रविवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव),नागपूर यांच्याकडून जारी करण्यात आले.

दरम्यान, रविवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. सोमवारी सकाळी पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला विन विभागाचे पथक घेऊन गेले. याबाबात ग्रामस्थांना कोणतीच कल्पना न दिल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

दरम्यान, खातगाव टाकळी रस्त्यालगत पानसंबळ वस्तीवर एका विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. वनविभागाने ग्रामस्थांना अंधारात ठेवले तसेच दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला. खारेकर्जुने भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने पकडला, तर मग हा विहिरीत पडलेला बिबट्या आला कुठून? असा सवाल गावकऱ्यांनी केला. बिबट्या विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. तसेच बिबट्याला विहिरीतून पकडण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे पथक दाखल झाले. पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी पिंजराही आणला. मात्र, त्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढू नका, त्याला जाग्यावरच मारा, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांसह महिलांनी घेतली.

दरम्यान, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेशही दिले असल्यामुळे बिबट्याला विहिरीतून बाहेर काढू नका, बिबट्याला ठार मारा नाही तर आम्ही फाशी घेऊ, अशी मागणी महिलांनी लावून धरली. शेवटी सायंकाळी या बिबट्याला वनविभागाने गावकरी व पोलिसांच्या मदतीने पकडण्यात यश आले. या बिबट्याची नरभक्षक असल्याची तपासणी करण्यात येणार आहे.

वनविभागाकडून दिशाभूल !

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने गावात पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्यात रात्री बिबट्या अडकला. वनविभागाने सोमवारी सकाळी पकडलेला बिबट्या घेऊन गेले. दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक होत वनविभागाने बिबट्या धरलाच नाही, ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पकडलेला बिबट्या ग्रामस्थांना दाखवलाच नसल्याच्या आरोप ग्रामस्थांनी केला.

पकडलेला बिबट्या वनविभागाने ग्रामस्थांना दाखवलाच नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमावस्थेत आहेत. बिबट्याबाबत यापुढील काळात अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी वनविभाग व प्रशासन जबाबदार राहील.
प्रताप शेळके, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

जिल्हाधिका-यांना निवेदन !

कर्जुनेखारे ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये वनविभागाकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच बिबट्याबाबत तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT