Women Participation In Politics Pudhari
अहिल्यानगर

Women Participation In Politics: महिलांचा राजकारणातील सहभाग; कर्जतच्या साहित्य संमेलनात वास्तवावर थेट भाष्य

‘राजकारणात खंबीरपणा आवश्यक’; महिलांनी निडरपणे पुढे यावे, 99 टक्के कौल

पुढारी वृत्तसेवा

गणेश जेवरे

कर्जत: जिल्ह्यातील कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित अखिल भारतीय चौथे शिक्षिका साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक चर्चेपुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय वास्तवावर प्रकाश टाकणारे ठरले. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ‌‘महिलांचा राजकारणातील सहभाग : सत्य आणि कथ्य‌’ या विषयावर झालेली गोलमेज चर्चा ही संमेलनाची अँकर स्टोरी ठरली.

या चर्चेच्या अध्यक्षीय मनोगतात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विमल ढेरे यांनी सांगितले की, आज राजकारणातील फोफावलेले अर्थकारण संपले पाहिजे. स्वतःची ठाम राजकीय भूमिका नसेल तर राजकारणात उतरू नये. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात प्रवेश करून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. या साहित्य संमेलनातील सर्वात हाय व्होल्टेज व उपस्थित हजारो महिलांच्या पसंतीस उतरलेला कार्यक्रम म्हणजे राजकारणातील महिलांची गोलमेज परिषद ठरली. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी खास त्यांच्या शैलीमधून सध्याच्या राजकारणावर झणझणीत प्रकाश टाकणारा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम उपस्थितांची दाद घेऊन गेला.

राजकारणाचा चिखल झाला आहे का? महिलांचे राजकारण किती सुरक्षित? या सर्व प्रश्नांवर झालेल्या या चर्चेत कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले, उषा राऊत, प्रतिभा भैलुमे, मीनाक्षी बाळासाहेब साळुंके, अश्विनी कानगुडे, नगरसेविका ताराकाकू कुलथे, ज्योती शेळके, लंका खरात, छाया शेलार, हर्षदा काळदाते, अश्विनी दळवी, मोनाली तोटे, शीतल धांडे यांनी सहभाग घेतला.

दोन तास रंगलेल्या चर्चेत महिलांनी राजकारणातील प्रवेश, निवडणूक अनुभव, चांगले-वाईट प्रसंग, कुटुंबाचा पाठिंबा, आरक्षणामुळे मिळालेली संधी, चूल आणि मूल सांभाळत करावी लागणारी कसरत, तसेच आजच्या राजकारणातील वास्तव यावर अत्यंत मोकळेपणाने संवाद साधला. भावनिक व्यक्ती राजकारणात फार काळ टिकत नाही. खंबीरपणा आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत महिलांचे स्थान राजकारणात अबाधित असावे, असे सहभागींचे मत होते. भविष्यात पाणी, स्वच्छता, गृहउद्योग, युवतींचे प्रश्न, रस्ते व वाहतूक यावर काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

काही महिला पदाधिकाऱ्यांनी याही परिस्थितीमध्ये आम्ही खंबीरपणे मात करून, तर काहीजणांनी मात्र राजकारणाचा चिखल झाला आहे असे म्हणत आता राजकारणातून बाहेर पडण्याची मानसिकता झाली आहे असेही स्पष्टपणे सांगितले. चर्चेच्या शेवटी विद्यार्थिनी व शिक्षिका, तसेच उपस्थित महिला लोकप्रतिनिधींमध्ये स्त्रियांनी राजकारणात प्रवेश करावा का? या प्रश्नावर घेतलेल्या मतदानात 99 टक्के सहभागी महिलांनी निडरपणे राजकारणात उतरावे असा स्पष्ट कौल दिला. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. राजेश दळवी यांनी, तर आभार डॉ. अशोक पिसे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT