Karjat No Confidence Motion Pudhari
अहिल्यानगर

Karjat No Confidence Motion: कर्जत उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव ११-० मतांनी मंजूर

सहा नगरसेवक मतदानाला गैरहजर; व्हीप मोडणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई होणार, अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: कर्जतचे उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव बुधवारी (दि.15) ११ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करण्यात आला. पीठासन अधिकारी छाया सुनील शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान, प्रस्तावावर मतदानासाठी अनुपस्थित राहिलेल्या आमच्या गटामधील नगरसेवकांवर अपात्रतेबाबत कारवाई करणार असल्याची माहिती गटनेते प्रा. सतीश पाटील यांनी दिली.

नगराध्यक्षपदी छाया सुनील शेलार यांची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी तेरा नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव नगराध्यक्षांकडे दाखल केला होता. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता या संदर्भात विशेष सभा बोलवण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या एकूण 15 सदस्यांचा नोंदणीकृत गट आहे. या गटाचे गटनेते प्रा. सतीश पाटील आहेत. त्यांनी सर्व गटातील नगरसेवकांना व्हीप बजावला होता. यापूर्वी पाटील यांनी नगराध्यक्ष रोहिणी घुले पाटील त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यांनी बहुमत नसल्यामुळे विशेष सभेपूर्वीच राजीनामा दिला.

त्यानंतर उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावर तेरा नगरसेवकांनी सह्या करून अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र यामधील दोन नगरसेविका ताराबाई सुरेश कुलथे व मोनाली ओंकार तोटे यांनी प्रा. राम शिंदे यांच्याकडे उपनगराध्यक्षपद मिळावे अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

विशेष सभा झाल्यानंतर पीठासन अधिकारी छाया शेलार, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नामदेव राऊत गटनेते प्रा. पाटील यांनी पत्रकारांना सांगितले, की संतोष मेहत्रे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव अकरा विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करण्यात आला आहे. आमच्या गटातील सर्व 15 नगरसेवकांना व्हीप बजाविण्यात आला होता. तसेच वृत्तपत्रामधूनही प्रसिद्धी देण्यात आली होती. जे गटामधील सहा सदस्य अनुपस्थित राहिले, त्या सर्वांना अपात्र करण्यासाठी आम्ही लगेचच कायदेशीर कार्यवाही करणार आहोत. दरम्यान, अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जिल्हाधिकारी घेणार पुढील निर्णय

मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांना पत्रकारांनी अविश्वास प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले, की अकरा विरुद्ध शून्य अशा फरकांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे. याबाबत पुढील सर्व निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. यामुळे मंजूर किंवा नामंजूर याबाबत मी काही सांगू शकत नाही.

दोघीही अनुपस्थित

दरम्यान, आज अविश्वास प्रस्तावाच्या वेळी ताराबाई सुरेश कुलथे व मोनाली ओंकार तोटे या दोन नगरसेविका अनुपस्थित होत्या. या सभेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या 15 नगरसेवकांच्या गटामधील एकूण सहा नगरसेवक अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत विशेष सभेचे कामकाज पीठासन अधिकारी छाया शेलार यांनी घेतले. या वेळी संतोष मेहत्रे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सभागृहामध्ये मांडण्यात आला. हात वर करून उपस्थित अकरा नगरसेवकांनी त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करत प्रस्ताव मंजूर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT