

चिचोंडी पाटील: नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील माणिकनगर परिसरातील रखडलेल्या अंगणवाडी इमारतीचे प्रकरण दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे. अंगणवाडीचे काम सुरू न झाल्याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे पत्राद्वारे विचारणा करत काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ग्रामपंचायत कार्यालयात काही माजी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाल्याची चर्चा गावात रंगली आहे.
विशेष म्हणजे, ज्या प्रभागातील अंगणवाडीचे काम रखडले आहे, त्याच प्रभागातील काही संबंधित माजी सदस्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याची चर्चा असल्याने ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही बैठक नेमकी कोणाच्या पुढाकाराने बोलावण्यात आली होती? बैठकीचा अधिकृत विषय काय होता? बैठकीत अंगणवाडीच्या रखडलेल्या कामाबाबत चर्चा झाली का? आणि जर झाली असेल, तर ज्या प्रभागाशी हा प्रश्न थेट संबंधित आहे, त्या प्रभागातील माजी सदस्यांना चर्चेपासून दूर का ठेवण्यात आले? अशा प्रश्नांमुळे गावातील चर्चांना उधाण आले आहे.
अंगणवाडी बांधकामाचे प्रकरण यापूर्वीच प्रशासकीय दिरंगाई आणि कामाच्या मुदतीतील तफावतीमुळे चर्चेत आले आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार, जिल्हा परिषदेने ५ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायतीला कार्यारंभ आदेश देऊन चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीने निविदा प्रक्रिया राबवून १९ जानेवारी २०२६ रोजी ठेकेदाराची नियुक्ती करत नऊ महिन्यांची मुदत दिल्याचे समोर आले. त्यातच काम सुरू न झाल्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायतीला पत्र पाठविण्यात आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झाल्याची चर्चा असलेल्या बैठकीमुळे प्रकरणातील उत्सुकता आणखी वाढली आहे.
या बैठकीतील निर्णयांबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी बांधकाम प्रकरणावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती का, जिल्हा परिषदेच्या पत्रानंतर पुढील भूमिका ठरविण्यासाठी बैठक घेण्यात आली का, की अन्य कोणत्या विषयासाठी माजी सदस्यांना बोलावण्यात आले होते, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः ज्या प्रभागातील चिमुकल्यांच्या अंगणवाडीचा प्रश्न आहे, त्या प्रभागातील काही माजी सदस्यांनाच बैठकीपासून दूर ठेवल्याची चर्चा खरी असेल, तर त्यामागील कारण स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
एकीकडे नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम रखडले आहे, तर दुसरीकडे सध्या अंगणवाडी भरत असलेल्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना हातात खोरे घेऊन साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी लागत असल्याची बाबही यापूर्वी समोर आली आहे. अशा परिस्थितीत चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असताना सर्व संबंधितांनी एकत्र येऊन काम तातडीने मार्गी लावण्याऐवजी बैठकीबाबतच गोपनीयता आणि संभ्रम निर्माण होत असेल, तर त्यामुळे ग्रामस्थांचा संशय वाढणे स्वाभाविक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
त्याच ठेकेदाराला काम देणे योग्य का?
संबंधित ठेकेदाराने हे काम मुदत संपूनही अद्याप सुरू केलेले नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या पत्रानंतर या अंगणवाडीचे काम परत त्याच ठेकेदाराला द्यावे का हा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
बैठकीमध्ये ठरले तरी काय?
ग्रामपंचायत कार्यालयातील बैठकीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली? बैठकीचा अधिकृत अजेंडा काय होता? अंगणवाडी बांधकामाचा विषय चर्चेला आला होता का? आणि संबंधित प्रभागातील माजी सदस्यांना निमंत्रण का देण्यात आले नाही? याबाबत संबंधितांनी स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा या प्रकरणाभोवती निर्माण झालेला संशय आणि तर्क-वितर्क आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.